'ज्यांना महाराष्ट्रात जमले नाही, ते दिल्ली काय जिंकून देणार?' राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला टोला

दिल्ली विधानसभा निवडणुकीला (Delhi Assembly Election 2020) केवळ काहीच वेळ शिल्लक राहिला असून या निवडणुकीत कोणात्या पक्षाचा झेंडा फडकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिल्लीत आपचे (AAP) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे सरकार आहे. मात्र, या निवडणुकीत दिल्ली काबीज करण्यासाठी भाजपचे (BJP) जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अरविंद केजरीवाल यांना आव्हान देण्यासाठी भाजपने महाराष्ट्रातील काही नेत्यांना यात सहभागी करुन घेतले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपवर जोरदार टीका केली आहे. ज्या नेत्यांना महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता आली नाही, ते दिल्ली काय जिंकून देणार ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या फेसबूक पेजवरून उपस्थित करुन भाजपला चिमटा काढला आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या फेसबूक पेजवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी लिहले आहे की, दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता जेमतेम एक दिवस उरला आहे. दिल्लीच्या जनतेने भाजपाला साफ नाकारल्याचेच अनेक सर्वेक्षणांमधून समोर आलेय. त्यामुळे भाजपाने दिल्ली निवडणुकीचा प्रचंड धसका घेतला असून दिल्ली आता आपल्या हाती लागणार नाही असेच जणू त्यांना वाटत आहे. यामुळे भाजपाने आपल्या सभांची संख्या दुप्पट केली आहे, तर महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्यांची फौज दिल्लीला बोलवली आहे. याशिवाय भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा आणि अमित शहा स्वतः या सभांना संबोधित करणार आहेत. भाजपा दिल्ली जिंकण्यासाठी आता महाराष्ट्राचे प्रचार कार्ड वापरत आहे. पण ज्यांना महाराष्ट्राने नाकारले ते दिल्ली कशी जिंकून देणार हा प्रश्नच आहे, अशी पोस्ट लिहण्यात आली आहे. हे देखील वाचा- 'मनसेच्या जीवावर मोठे झालेल्यांनी आम्हाला शिकवू नये', असे ट्विट करत अमेय खोपकर यांनी प्रवीण दरेकर आणि राम कदम यांच्यावर साधला निशाणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अधिक जागा मिळवूनही भाजपला राज्यात सरकार स्थापन करता आले नाही. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षासमोर आप आणि काँग्रेसचे कडवे आव्हान असणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील 10 दिग्गज नेते आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरवले आहेत. दिल्लीतील चौका- चौकात महाराष्ट्रातील या नेत्यांच्या सभा पार पडणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, खासदार रक्षा खडसे, हीना गावित, पूनम महाजन, भारती पवार, आमदार आशिष शेलार या दिग्गज नेत्यांच्या सभा दिल्लीत आयोजित करण्यात आल्या होत्या.