सध्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. पण याच प्रचार सभेत घडलेल्या एका चुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरमध्ये 9 ऑक्टोबर रोजी शरद पवार यांची प्रचारसभा झाली. ही सभा राष्ट्रवादीचे उमेदवार रवि राठी यांच्या प्रचारार्थ मुर्तिजापूर येथील गाडगेबाबा मैदानावरही झाली होती.
मात्र या सभेत प्लास्टिक बंदीचा कायदा पळाला न गेल्याने राष्ट्रवादीला दंड आकारण्यात आला आहे. सभेला उपस्थित लोकांसाठी पिण्याचे पाणी द्यायला प्लास्टिकचे ग्लास वापरले गेले होते. आणि म्हणूनच मुर्तिजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी पुढाकार घेऊन ही दंडाची कारवाई केली आहे.
त्याच सभेत पवारांसह सर्वच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कायद्याचं राज्य नसल्याचा आरोप आपल्या भाषणांमधून केला होता. मात्र राष्ट्रवादी पक्षानेच प्लास्टिक वापराचा कायदा तोडल्याचे समोर आले आहे.
आज (ऑक्टोबर 11) दुपारी हा दंडाचा मेमो राष्ट्रवादी पक्षाला बजावण्यात आला असून लगेचच पक्षाकडून ही दंडाची रक्कम भरण्यात आली आहे.