Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यातील सर्वच मतदारसंघात प्रचाराचा धुराळा उठला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात स्टार प्रचारकांच्या सभेनंतर आता उमेदवार स्थानिक पातळीवर स्वतः जातीने प्रचारांवर भर देत आहेत. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, नाशिक मध्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि निफाड या पाचही मतदारसंघात चुरस पाहायला मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यात 15 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 साली पार पडलेल्या निवडणुकीमध्ये इथे राष्ट्रवादीने 4, काँग्रेसने 2, शिवसेना 4, माकप 1 आणि भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वातावरण पूर्णतः बदलले आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक औत्सुक्याची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर चला पाहूया जिल्ह्यातील मतदारसंघ आणि लढती
नांदगाव (Nandgaon) – नाशिक जिल्ह्यामधील दुष्काळी मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जाते. छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ इथले माजी आमदार होते. यामुळेच या मतदारसंघाला महत्व प्राप्त झाले. राष्ट्रवादीचे अतिशय जवळचे समजले जाणारे पंकज भुजबळ 2009 आणि 2014 अशा दोन्ही विधानसभेला इथून निवडून आले आहेत. 2009 मध्ये त्यांनी शिवसेनेचे आमदार संजय पवार यांचा, तर 2014 साली सुहास कांदे व अद्वय हीरे यांचा पराभव केला होता.
यंदा पुन्हा एकदा राष्ट्रवादीने पंकज यांनाच उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्यासमोर शिवसेनेने सुहास कंदे यांना उभे केले आहे.
नाशिक पश्चिम (Nashik West) – नाशिक शहरातील हा मतदारसंघ शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. औद्योगीक क्षेत्रामुळे या मतदारसंघात कामगारांची संख्या अधिक आहे. 2002 पासून भाजपच्या नगरसेविका म्हणून काम सुरु करणाऱ्या सीमा हीरे या इथल्या विद्यमान आमदार आहेत. महत्वाचे म्हणजे 2014 साली शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे अशा बहुरंगी लढत पाहायला मिळाली होती. त्यामध्ये हीरे यांनी 30 हजार मतांनी विजय प्राप्त केला.
यंदा पुन्हा एकदा भाजपकडून सीमा हीरे तर कॉंग्रेसकडून अपूर्व हीरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
नाशिक पूर्व (Nashik East) – नाशिक शहरातील किंबहुना परिसरातील हा एक महत्वाचा मतदार संघ. अनेक छोटी मोठी मंदिरे या मतदारसंघात आहेत तसेच विविध जातींचे लोक या मतदारसंघात राहतात. त्यामुळे प्रत्येकवेळी निवडणुकीचे वेगळे चित्र इथे पाहायला मिळते. सध्या भाजपचे बाळासाहेब सानप हे इथले विद्यमान आमदार आहेत. मुख्य म्हणजे सानप हे भाजपचे नाशिक शहरातील पहिले महापौर आहेत. 2014 च्या विधानसभेवेळी त्यांनी शिवसेनच्या सूर्यकांत लवटे यांचा जवळजवळ 50 जहर मतांनी पराभव केला होता.
यंदा बाळासाहेब सानप हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे राहुल ढिकले यांचे आव्हान असणार आहे.
नाशिक मध्य (Nashik Central) – 2014 साली भाजपच्या देवतांनी फरांदे या इथल्या विद्यमान आमदार झाल्या. यंदाही भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर कॉंग्रेसकडून हेमलता पाटील, मनसेकडून नितीन भोसले यांचे आव्हान असणार आहे.
निफाड (Niphad) – 1995 पासून या मतदारसंघात शिवसेनचे वर्चस्व आहे. ही परंपरा 2004 साली मोडली, पुढे 2009 आणि 2014 सालीही पुन्हा शिवसेनेने आपला भगवा इथे फडकवला. 2004 साली शिवसेनेच्या मंदाकिनी कदम यांना डावलून जनतेने राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांना निवडले. त्यानंतर 2009 साली मंदाकिनी यांचे पुतणे अनिल कदम यांनी बनकर यांचा पराभव केला. 2014 सालीही बनकर यांना कदम यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
यंदाच्या विधानसभेसाठी पुन्हा एकदा शिवसेनेन अनिल कदम यांना संधी दिली आहे. पुन्हा एकदा त्यांच्यासमोर दिलीप बनकर यांचे आव्हान असणार आहे.
दरम्यान सध्या कार्यरत असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. 21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करत निवडणूकीची तारिख जाहीर केली. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.