PM Narendra Modi Cabinet Expansion: राज्यातील सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारला आज (30 जूलै) एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात सुरु असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची (Maharashtra Cabinet Expansion) चर्चा प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे माहिती नाही मात्र केंद्रात तरी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाला दोन मंत्रिपदे मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यात राजधानी दिल्ली येथे काल रात्रीच एक बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय नेतृत्त्व जवळपास निर्णयापर्यंत पोहोचल्याचे समजते.
राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त शोधला जाण्याची शक्यता आहे. एबीपी माझाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याती बैठकीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात मंत्रिमंडळ विस्ताराचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मिळणाऱ्या दोन मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालायची याचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे असणार आहेत. दरम्यान, शिंदे यांच्या खासदारांना दिली जाणारी मंत्रीपदे इतर कोणत्या खात्याची असणार की, राज्यातीलच भाजपच्या दोन केंद्रीय मंत्र्यांची विकेट टाकून त्यावर शिंदे गटाचीवर्णी लावली जाणार याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Narayan Rane On Uddhav Thackeray: 2024 च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची सेना पाचपेक्षा जास्त जागा जिंकणार नाही; नारायण राणे यांचा दावा)
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाला की त्यानंतर लगेच राज्य मंत्रिमंडळ विस्तारही केला जाणार असल्याचे समजते. आषाढी वारीनिमित्त केली जाणारी शासकीय महापूजा आटोपताच मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्ली गाठली. दरम्यान, केंद्रीय मंत्रीपदासाठी शिंदेंच्या खासदारांमध्ये जोरदार चुरस असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या गाटातील कोण मंत्री होते याबाबतही उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, शिंदे गटाने काही दिवसांपूर्वी दिलेली जाहीरात आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखती. यावरुनही राजकीय वर्तुळात विविध अर्थ आणि तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही लोकांना वाटते दोन्ही बाजूंनी सुप्त संघर्ष सुरु आहे. काहींना वाटते दिलजमाई झाली आहे.