महाराष्ट्रात, शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यातील आरोप-प्रत्यारोप थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या वक्तव्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नाईक यांचा आरोप आहे की, प्रमोद जठार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्याशी केली आहे. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. दुसरीकडे लांजा राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी देखील अशीच एक तक्रार रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात केली आहे.
पीटीआयशी बोलताना नाईक म्हणाले की, राणेंची छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना करणे धक्कादायक आहे. छत्रपती संभाजी महाराज हे एक महान नेते होते ज्यांना संगमेश्वर (रत्नागिरी जिल्हा) येथे मुघल शासक औरंगजेबाने अटक केली आणि अत्याचार केला. प्रमोद जठार यांनी नारायण राणे यांची संभाजी महाराजांशी तुलना करून त्यांच्या लाखो अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत.
आमदार म्हणाले की, त्यांनी बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कनकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि जठार यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. प्रमोद जठार यांनी 24 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेबाचे राज्य संपले, असे वक्तव्य केलेले आहे. तसेच जठार यांचे हे वक्तव्य चिथावणीखोर असून यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. (हेही वाचा: सीएम उद्धव ठाकरे यांच्या 'त्या' विधानाबाबत MP Sanjay Raut यांचे स्पष्टीकरण- 'योगींनी शिवाजी महाराजांचा अपमान केला होता')
नाईक हे शिवसेनेचे नेते आहेत ज्यांनी 2014 मध्ये सिंधुदुर्गातील कुडाळ विधानसभा मतदारसंघातून राणेंचा पराभव केला होता. दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थप्पड मारल्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. त्यांना मंगळवारी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथून अटक करण्यात आली आणि नंतर रायगडमधील महाड येथील न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. त्यांच्या या विधानाबाबत संपूर्ण महाराष्ट्रात निषेध व्यक्त करण्यात आला.