Maharashtra Congress president: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडचे शिक्कामोर्तब, लवकरच घोषणा
Nana Patole | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Maharashtra Congress State President) पदासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नावाला काँग्रेस हायकमांडने ( Congress High Command) मान्यता दिल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसकडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. येत्या एक दोन दिवसांमध्ये त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आहेत. थोरात यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद, राज्याचे महसूल मंत्री आणि विधिमंडळ काँग्रेस गटनेता अशी तीन पदं आहेत. त्यामुळे एकाच व्यक्तीकडे पदांचे केंद्रीकरण नसावे यासाठी काँग्रेस हायकमांडने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक नावे चर्चेत होती. यात काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि गुजरात प्रभारी राजीव सातव, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, यशोमती ठाकूर यांच्यासह इतरही नावांचा समावेश होता. परंतू, हायकमांडने नाना पटोले यांच्यात नावावर शिक्कामोर्तब केल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. (हेही वाचा, Maharashtra Congress State President: महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी जोरदार स्पर्धा, अशोक चव्हाण, राजीव सातव, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांची नावे चर्चेत)

नाना पटोले हे मूळचे काँग्रेसचे. काही कारणांमुळे त्यांचे आणि काँग्रसचे बिनसले लोकसभा निवडणूक 2014 पूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपनेही त्यांना तिकीट दिले आणि पटोले लोकसभेवर निवडून गेले. परंतू, बंडखोर असलेल्या पटोले यांचे भाजपशी जमले नाही. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीच त्यांनी पंगा घेतला. त्यामुळे त्यांनी भाजपचा तडकाफडकी राजीनामा दिला. 2014 नंतर भाजप ऐन यशोशिखरावर असताना सत्तेला लाथ मारणारे पटोले हे पहिले खासदार होते. अल्पावधीतच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या प्रयत्नांतून गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पटोले यांचा काँग्रेस प्रवेश पार पडला.

दरम्यान, नाना पटोले यांच्या निवडीमागे हायकमांडचीही काही गणिते असल्याची चर्चा आहे. एक तर नाना पटोले हे बिनधास्त आहेत. त्यामुळे भाजपला तोडीस तोड उत्तर देण्याची त्यांच्यात क्षमता आहे. राज्यात असलेल्या महाविकासआघा़डी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत काँग्रेस पक्ष काहीसा झाकोळला आहे. त्यामुळे काँग्रेसची संघटनात्मक बांधणी करुन काँग्रेसला प्रकाशझोतात आणण्यासाठी नाना पटोले महत्त्वाचे ठरु शकता, असे काहीसे गणीत हायकमांडचे असावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.