कोल्हापूर: मुस्लीम समाजाकडून 'ईद'च्या सणाला बकरी न कापण्याचा निर्णय; पूरग्रस्तांना करणार मदत
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

अवघ्या काही दिवसांत महापुराने सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याचे चित्र संपूर्ण पालटले आहे. मुसळधार पाऊस, कोयना-राधानगरी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे मोठा जलप्रलय आला आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावे पाण्याखाली गेली. आता पूर ओसरायला सुरुवात झाली आहे, मदतीचा ओघ सुरु झाला आहे. अशात उद्या देशात बकरी ईदचा (Bakri Eid) सण साजरा होत आहे. मात्र कोल्हापूरमधील मुस्लीम समाजाने, ‘बकरी ईद’ला येणारा खर्च टाळून ती रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे रातोरात लोकांना आपली घरे, संसार सोडून गावाबाहेर पडावे लागेल. यामध्ये शेतीचे नुकसान झाले, जनावरांचे नुकसान झाले, अनेक लोक मारले गेले. पूर ओसरेल, शासन मदत करेल मात्र तरीही ही मदत कमी पडणार आहे. सध्या अनेक सामाजिक संस्था, देवस्थाने, इतर नागरिक पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यांच्यासोबतच कोल्हापुरातील मुस्लीम बांधवही उभे राहिले आहेत. धर्म, जात, पंथ बाजूला सारून त्यांनी येणारा बकरी ईद सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. बकरी ईदला बकरी न कापता ही रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहेत. (हेही वाचा: कोल्हापूर, सातारा मध्ये पूर ओसरायला सुरूवात; देशात महापूराने घेतले 97 बळी)

सागंली जिल्हातील पूरग्रस्त भाग सोङून जे मुस्लीम बांधव आहेत, त्यांनी देखील हा निर्णय घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. बकरी ईदच्या दिवशी एका बोकडाला साधारण 15 ते 20 हजार खर्च येतो. हा खर्च टाळून ही आर्थिक मदत पूरग्रस्त लोकांसाठी जास्त उपयोगी ठरू शकते असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, पूर ओसरायला सुरुवात झाली असली तरी अजूनही सांगली जिल्ह्यात बचावकार्य सुरु आहे. पुणे, मुंबई राज्यातील अनेक शहरांमधून मदचीचा ओघ पूरग्रस्त भागात वाढत आहे. शासनही वैद्यकीय सुविधेसह इतर जीवनावश्यक गोष्टी पुरवत आहे त्यात मुस्लीम समाजाकडून घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे.