कोल्हापूर, सातारा मध्ये पूर ओसरायला सुरूवात; देशात महापूराने घेतले 97 बळी
Sangli Flood (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली सह कोकणामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मागील काही दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्रात आता पावसाचा जोर मंदावला असल्याने पूराचं पाणी ओसरायला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रासह केरळ, गुजरात, कर्नाटक या भागातही पावसाने थैमान घातल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. देशामध्ये पूरामुळे सुमारे 97 जणांचे बळी गेले आहे. गुरूवारी (8 ऑगस्ट) दिवशी पूरामध्ये बचावकार्य करताना सांगलीतील ब्रम्हनाळ येथे बोट पलटल्याची दुर्घटना झाली. यामध्ये 16 हून अधिक जण मृत्यूमुखी पडले. मात्र या घटनेव्यक्तिरिक्त पूरात वाहून गेलेल्यांची घटना महाराष्ट्रात घडलेली नाही. कोकणातही पावसाने उसंत घेतल्याने रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड भागातील परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे.

महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त भागामध्ये बचावकार्य आणि मदतीचा वेग आता वाढला आहे. लाखो लोकांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करून त्यांच्या अन्नाची आणि प्राथमिक वैद्यकीय सुविधेची सोय करण्यात आली आहे. सांगलीतील पूर ओसरत असला तरीही NDRF चं बचावकार्य आज सातव्या दिवशीदेखील सुरू आहे. Maharashtra Flood 2019: कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्तांना तुम्ही कशी मदत करू शकाल?

महाराष्ट्रासह केरळ मधील वायनाड, कोळिक्कोड भागात पूरस्थिती गंभीर आहे. तर कर्नाटकातही भूस्स्खलन झाल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. तसेच दरडी कोसळण्याच्या घटनाही समोर आल्याने वाहतूक व्यवस्था खोळंबली आहे. अमित शहा आज कर्नाटकात हवाई पाहणीच्या मदतीने पूराच्या स्थितीची पाहणी करणार आहेत.

गुजरातमध्येही पूराने सुमारे 19 जणांचे बळी घेतले आहे. मात्र एनडीआरएफच्या मदतीने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या देशभरातील देवस्थानं आणि सामान्यानी मदतीसाठी हात पुढे केला आहे.