मुंबईची दुसरी लाईफ लाईन आता रुग्ण सेवेसाठी धावणार; बेस्टच्या ताफ्यातील एकूण 20 एसी बसचे रुपांतर रुग्णवाहिकेत

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) हादरून टाकले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढीमुळे सर्वत्र घबराट पसरली आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेकजण मोलाचा वाटा उचलत आहेत. कोरोना विरोधातील लढ्यात आता बेस्टही (BEST) महत्वाची कमगिरी बजावताना दिसत आहे. बेस्ट उपक्रमाकडून रुग्ण सेवा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील 20 मिनि वातानुकूलित बसेसचे (BEST Mini AC Bus) रुपांतर रुग्णवाहिकेत करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची लाईफ लाईन बेस्ट बस आता रुग्ण सेवेसाठीही धावणार आहे.

महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबई परिसरात आढळून आले आहेत. दरम्यान, कोरोनाबाधित किंवा संशियाताला वेळेवर रुग्णलयात घेऊन जाणे गरजेचे आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पालिकेच्या रुग्णवाहिका कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित किंवा संशयिताला वेळेवर रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आता बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात असलेल्या मिनि वातानुकूलित बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेत करण्यात आले आहे. बेस्ट उपक्रमाकडून सध्या 7 मिनि वातानुकूलित बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेत करण्यात आले आहे. बेस्टच्या एकूण 20 मिनि वातानुकूलित बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेत करणार आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे. हे देखील वाचा- मुंबई: प्रतिक्षा नगर मधील दोन पत्रकारांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी आल्याने टाळ्या वाजवून स्वागत (Watch Video)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बंद असलेल्या बसेसचा सदुपयोग करत पालिकेने कोरोना रुग्णांसाठी ही सेवा सुरु केली आहे. कोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात आतापर्यंत 26 हजार 919 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे 826 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 5 हजार 914 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 7 हजार 628 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैंकी 323 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.