Rains - ANI

Mumbai Weather: गणेशोत्सवाच्या उत्साहात मुंबई आणि परिसरात पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. मुंबईत गुरुवारी हलका ते मध्यम पाऊस झाला. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणेसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, जो शुक्रवार सकाळपर्यंत लागू राहील. त्याचवेळी रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात शुक्रवारपर्यंत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अंदाजानुसार, सोमवारपर्यंत मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये गडगडाटासह हलका पाऊस पडेल.गुरुवारी दुपारी, IMD ने मुंबई आणि ठाणेसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामुळे काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी रायगड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून त्यात मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. हे देखील वाचा: Mumbai Fire: परेल येथील टाइम्स टॉवर इमारतीला लागली आग; कोणतीही जीवितहानी नाही

गणेशोत्सवावर पावसाचा परिणाम

IMD नुसार शुक्रवारपासून पावसाची तीव्रता कमी होईल, परंतु आठवड्याच्या शेवटी हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील. मुंबईत कोणताही विशिष्ट इशारा नसताना रायगड जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस यलो अलर्ट कायम राहणार आहे.

स्कायमेट वेदर सर्व्हिसेसचे महेश पलावत यांच्या मते, मुंबई आणि उत्तर कोकण भागात 10-11 सप्टेंबरपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील. ते म्हणाले, "बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र (एलपीए) तयार झाले असून ते मध्य प्रदेश आणि विदर्भाकडे सरकणार आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे."

मुंबईतील जलाशयांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे

पावसामुळे मुंबईतील सात प्रमुख जलाशयातील पाण्याची पातळी 98.24 टक्क्यांवर पोहोचली असून, गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी पातळी आहे. 2023 मध्ये त्याच दिवशी पाण्याची पातळी 90.54% होती, तर 2022 मध्ये ती 98% वर पोहोचली. गेल्या 24 तासांतील सर्वाधिक पावसाची नोंद मध्य वैतरणा तलावात (39 मिमी), त्यानंतर अप्पर वैतरणा (32 मिमी), आणि मोडक सागर आणि भातसा तलावात प्रत्येकी 28 मिमी पावसाची नोंद झाली.