मुंबईतील हवामान (Mumbai Weather) सध्या उष्ण आणि आर्द्रतेने भरलेले आहे, ज्यामुळे उष्णता अधिक तीव्र जाणवते. सध्या दुपारच्या वेळी उष्णतेची तीव्रता इतकी जास्त आहे की, नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. मात्र आता मुंबईकरांना उन्हाळ्याच्या उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील आठवड्यात मुंबई आणि आसपासच्या भागात हलक्या रिमझिम पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या मुंबईसाठी कोणताही अलर्ट जारी केलेला नसला तरी, ठाणे आणि रायगडसाठी 31 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सध्या शहरासाठी सांताक्रूझ वेधशाळेत 33.6 अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे 31 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अंदाजानुसार आठवड्याच्या शेवटी तापमान 36 अंशांपेक्षा जास्त वाढू शकते, परंतु सोमवारपासून सुरू होणाऱ्या अपेक्षित पावसामुळे आणि गडगडाटी वादळामुळे हे तापमान कमी होऊ शकते. अहवालानुसार, ठाणे आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसानंतर, म्हणजेच 2 एप्रिलनंतर मुंबईतील कमाल तापमान सुमारे 33 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे.
उन्हाळ्यात पूर्व-मान्सून पाऊस असामान्य असला तरी, मुंबईत यापूर्वी असे हवामान अनुभवले आहे, मार्च 2023 मध्ये सुमारे 17 मिमी पावसाची नोंद झाली होती. मार्चमधील हा सर्वात जास्त पाऊस होता. तुलनेने, सांताक्रूझ वेधशाळेत 2016 मध्ये 10 मिमी आणि 2015 मध्ये 13 मिमी पावसाची नोंद झाली. आगामी पावसाळ्याच्या तयारीसाठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) प्रमुख भूषण गगराणी यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती, ज्यामध्ये शहरातील पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागांचे संयुक्त सर्वेक्षण करण्यासह सक्रिय उपाययोजनांवर भर देण्यात आला. (हेही वाचा: Maharashtra Weather Update: राज्यात तापमान वाढले असतानाच काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता)
Mumbai Weather Update:
Wather Warning for 28th and 29th March 2025#imd #india #shorts #thunderstorm #rainfall #heatwave #windy @moesgoi @ndmaindia @DDNational @airnewsalerts pic.twitter.com/7rfofmA5ik
— India Meteorological Department (@Indiametdept) March 28, 2025
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष भूषण गगराणी यांनी आगामी मुंबई पावसाळ्याची तयारी करण्यासाठी काम पूर्ण झाल्यानंतर कचरा आणि बॅरिकेड्स साफ करण्याचे निर्देश बीएमसी वॉर्ड अधिकाऱ्यांना दिले. प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यासाठी पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागांचे संयुक्त सर्वेक्षण करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आणि अखंड उपनगरीय रेल्वे सेवा सुनिश्चित करण्यासाठी एजन्सींमध्ये प्रभावी समन्वय साधण्याचे आवाहन केले. रेल्वे परिसरात वृक्षतोड मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचे बंधन घातले. मुसळधार पावसामुळे होणारे धोके कमी करण्यासाठी, शहरातील सखल भागात 482 पाणी काढून टाकण्याचे पंप तैनात करण्याची घोषणा करण्यात आली.