मुंबई विद्यापीठाची घोडचूक : तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना केले नापास
मुंबई विद्यापीठ (Photo Credits: mu.ac.in)

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, मूल्यांकन प्रक्रियेमधील गोंधळ यांमुळे विद्यार्थ्यांचा विद्यापीठावरील विश्वास उडत आहे. बरेचवेळा विद्यापीठावर टीका करून, मोर्चे काढून, आंदोलने करूनदेखीलही हे प्रकार थांबले नसल्याचे नुकत्याच एका उदाहरणावरून दिसत आहे. मागच्या वर्षी विद्यापीठाची परीक्षा देऊन 97 हजार नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी फेरतपासणी अर्ज केले होते. आता नव्या मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्यांपैकी तब्बल 35000 विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका चुकीच्या पद्धतीने तपासल्याने मुंबई विद्यापीठाने त्यांना चक्क नापास केले होते.

गेल्या वर्षीचा निकाल लागल्यानंतर जवळ जवळ 97 हजार 313 विद्यार्थ्यांनी रिचेकिंगसाठी अर्ज केले होते. विद्यापीठाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आकडा आहे. यावरूनच विद्यापिठावरील विद्यार्थ्यांचा विश्वास उडाल्याचे दिसून येते. तर यापैकी 36% विद्यार्थ्यांना विद्यापीठाने चक्क नापास केले होते. या विद्यार्थ्यांनी जर का रिचेकिंगसाठी अर्ज केले नसते तर आज या मुलांच्या करिअरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते.

मागील 2014-16 या 3 वर्षांमध्ये 73000 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका चुकीच्या पद्धतीने तपासल्याने मूल्यांकनाच्या गुणवत्तेवरून प्रचंड टीका झाली होता. तसेच मागील वर्षीच विद्यार्थ्यांचे निकाल 2 महिने उशिरा लागले होते यावरूनदेखील बराच गदारोळ माजला होता. मात्र शेवटी निकाल लागल्यानंतर 35000 विद्यार्थ्यांना विद्यापीठाने नापास केले होते.

मागच्या वर्षी उन्हाळ्यात पार पडलेल्या परीक्षेतील 49, 596 विद्यार्थ्यांपैकी 16,739 विद्यार्थ्यांना विद्यापीठाने चुकून नापास केले होते.

विद्यापीठाच्या या गलथान कारभारावर आरटीआई कार्यकर्ता विहार दुर्वे यांनी सांगितले की. ‘विद्यापीठाच्या अशा कारभारामुळे विद्यार्थ्यांचा विद्यापिठावरील विश्वास उडत आहे. 2014मध्ये जवळ जवळ 80 हजार विद्यार्थ्यांनी रिचेकिंगसाठी अर्ज केले होते, हाच आकडा आता 1 लाखावर जाण्याची शक्यता आहे’