ATM/ Debit Cards (Photo Credits: Pixabay)

देशातील एटीएम घोटाळ्याच्या (ATM Fraud) प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2018-2019 मध्ये एटीएम फसवणूकीच्या एकूण प्रकरणांमध्ये 911 वरून 980 इतकी वाढ झाली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून, मुंबईमध्ये 233 प्रकरणे समोर आली आहेत. दोन नंबरवर राजधानी दिल्ली आहे, जिथे 179 प्रकरणे समोर आली आहेत. ,महाराष्ट्रामध्ये 4.81 कोटी रुपयांचा घोटाळा या एटीएमच्या माध्यमातून झाला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

या अहवालानुसार, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा हे असे तीन राज्ये आहेत, जिथे एकही एटीएम घोटाळा घडला नाही. या अहवालामध्ये 1 लाख रुपयांपेक्षा कमी फसवणूक झाली असलेली प्रकरणे सामील नाहीत. जर का अशी प्रकरणेदेखील सामिविष्ट केलीत तर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रानंतर सर्वात जास्त रुपयांची फसवणूक तामिळनाडू येथे झाली आहे. तामिळनाडू येथे 3.36 कोटी रुपयांचा एटीएम घोटाळा उघडकीस आला आहे. (हेही वाचा: एटीएमच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या महिलेने तब्बल 17 दिवस पाळत ठेवून चोराला पकडले)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फक्त वर वर दिसणारी माहिती आहे. 1 लाख पेक्षा कमी किमतीची प्रकरणे समाविष्ट केल्यास फसवणूक झालेल्या रकमेचा आकडा मोठ्या प्रमाणावर फुगण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे ऑनलाइन फसवणूक ही एक चिंताजनक बाब आहे. एटीएम मशीनवर स्किमर डिव्हाइसेस स्थापित करून फसवणूक करणे, ही सर्वसामान्य पद्धत बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. तसेच बँकेने मनाई केली असूनही अनेक लोक आपले एटीएम डीटेल्स अनोळखी लोकांसोबत शेअर करतात याचाही फायदा अशा ऑनलाईन चोरांना होतो.