एटीएमच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या महिलेने तब्बल 17 दिवस पाळत ठेवून चोराला पकडले
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Money Control.com)

मुंबई : वांद्रे (Bandra) परिसरात एटीएमच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या महिलेला, तब्बल 17 दिवसानंतर त्या चोराला पकडण्यात यश आले आहे. रेहाना शेख (Rehana Shaikh) असे या महिलेचे नाव असून, ती मुळची वडाळा येथील राहणारी आहे. भूपेंद्र मिश्रा (Bhupendra Mishra) असे या भामट्याचे नाव असून, त्याने रेहाना यांच्या खात्यातून 10 हजार रुपये काढले होते. याबाबत रेहाना यांनी पोलिसांमध्ये तक्रारदेखील केली होती. मात्र पोलिसांनी सहकार्य न दिल्याने रेहाना यांनी स्वतःच या चोराचा छडा लावायचे असे ठरवले. त्यानुसार त्यांनी तब्बल 17 दिवस त्या एटीएमवर पाळत ठेवली होती. शेवटी हा चोर त्यांच्या तावडीत सापडलाच. या चोरावर आधीच विविध पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचे 7 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार रेहाना शेख या वांद्र्याच्या पाली हिल भागात कामाला आहेत. 18 डिसेंबर रोजी सकाळी कामाला जाण्यास निघाल्या होत्या. ऑफिसला जाण्यापूर्वी त्या एटीएममध्ये गेल्या. त्यावेळी अनेकवेळा पासवर्ड टाकूनही पैसे निघू शकले नाहीत. यावेळी भूपेंद्र एटीएम बाहेरच उभा होता. खूप वेळा प्रयत्न करूनही पैसे निघू शकत नाहीत म्हटल्यावर तो रेहाना यांच्या मदतीला आला. मदत करताना त्याने रेहाना यांचा पासवर्ड माहिती करून घेतला. त्यानंतरही पैसे निघाले निघाले नाहीत. रेहाना ऑफिसमध्ये पोहचल्यावर त्यांना त्यांच्या खात्यातून 10 हजार रुपये काढले असल्याचा मेसेज आला. तो पाहून त्या तातडीने एटीएममध्ये पोहचल्या, मात्र तोपर्यंत भूपेंद्र निघून गेला होता. (हेही वाचा : म्हाडाकडून फसवणूक : तब्बल 1384 बेकायदेशीर घरे काढली विक्रीला)

त्यानंतर रेहाना यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली, मात्र पोलिसांनी हवे तसे सहकार्य केले नाही. शेवटी आपणच या चोराला पकडायचे हे ठरवून रेहाना यांनी त्या एटीएमवर पाळत ठेवायला सुरुवात केली. तब्बल 17 दिवस त्या रोज एटीएममध्ये जात होत्या. शेवटी 4 जानेवारीला हा भामटा त्यांना त्याच एटीएमजवळ घुटमळताना दिसला. त्यांनी ताबडतोप त्याला पकडून पोलिसांना फोन केला. पोलिसांनी भूपेंद्रला अटक केली असून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.