Railway | Image used for representational purpose | (Photo Credits: Facebook)

मुंबई पुणे प्रवास सातत्याने करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या दोन्ही शहरातील प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. यासाठी भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वेने (Central Railway) घेतलेली मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस ची (Mumbai-Pune Intercity Express) चाचणी फेरी यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता मुंबई-पुणे हे अंतर 2 तास 35 मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे.

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिल कुमार यांनी फायनान्स एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, पुश आणि पूल टेक्नोलॉजीच्या (Push and Pull Technology) मदतीने मुंबई-पुणे प्रवासातील सुमारे 30-35 मिनिटांचा कालावधी वाचवणे शक्य होणार आहे. मुंबई-पुणे हा प्रवास महामार्गाद्वारे करताना सुमारे 3 तासांचा वेळ लागतो. त्यामुळे इंटरसिटी एक्स्प्रेस हा मुंबई आणि पुणे प्रवासासाठी सर्वात जलद मार्ग आहे. (डेक्कन क्विन एक्स्प्रेस होणार अधिक सुसाट; मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ 30-35 मिनिटांनी कमी होणार)

पुश आणि पूल टेक्निकचा वापर नियमित प्रवास फेऱ्यांसाठी देखील करण्याचा मध्य रेल्वेचा मानस आहे. त्यामुळे कर्जत स्टेशनात बँकर इंजिन जोडण्यासाठी लागणारा वेळ वाचेल.

सध्या मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून पुणे स्टेशनपर्यंतचा प्रवास करण्यासाठी 3 तास 17 मिनिटांचा वेळ घेते. तर परतीच्या प्रवासासाठी सुमारे 3 तास 10 मिनिटांचा वेळ लागतो.

मात्र बदललेल्या वेळापत्रकानुसार मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस CSMT वरुन सकाळी 6.45 ऐवजी 6.40 ला निघेल आणि पुणे स्थानकात सकाळी 9.57 ऐवजी 9.20 वाजता पोहचले. परतीच्या प्रवासात पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस पुण्याहून संध्याकाळी 6.30 ऐवजी 5.55 सुटेल आणि CSMT ला रात्री 9.05 ला पोहचेल.

इंटरसिटी एक्स्प्रेसचे हे नवे वेळापत्रक 31 मे पासून लागू होईल आणि पुढील सात दिवसांसाठी तसेच ठेवले जाईल. या सात दिवसात इतर गाड्यांच्या वेळेला धक्का न लावता आणि प्रवाशांची गैरसोय न होता इंटरसिटी एक्स्प्रेस व्यवस्थित धावली तर हेच वेळापत्रक कायम ठेवलं जाईल.