महाराष्ट्रात वाढत्या पावसाच्या जोरासोबतच अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर मुंबई-पुणे हायवे (Mumbai Pune Highway) वर देखील दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता खबरदारीचा उपाय आणि काल रात्री खंडाळा घाटात दरडी कोसळल्याच्या लहान सहान घटनांनंतर सारा मलब दूर करण्यासाठी आता मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज (25 जुलै) 2 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 2 या वेळेत वाहतूक बंद ठेवली जाणार असल्याचं प्रशासनाने जाहीर केले आहे.
लोणावळा मध्ये मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहे. काल मध्य रात्रीपासून मुंबई-पुणे महामार्गावर मंदगतीने वहातूक पुढे सरकत आहे.
काल रात्री अडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्यानंतर मलबा हटवला आला मात्र काही काळ या मार्गावर मुंबई कडे येणारी वहातूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर पहाटे अंशत: वाहतूक पूर्ववत करण्यात आली मात्र आता ब्लॉक घेऊन दरडी हटवण्याचं काम पूर्ण केलं जाणार आहे.
वाहतूकीमधील बदल
पुणे- मुंबई प्रवासात चिवळे पॉइंट नजिक जुन्या मुंबई पुणे महामार्गाकडे वाहतूक वळविण्यात आली आहे. याच मार्गावरुन चारचाकी, हलकी मध्यम, अवजड वाहने पुढे जातील.12-2 या ब्लॉकच्या काळात ही वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळविण्यात येईल. दरडी हटविण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकडे जाणारी लेन पुन्हा सुरु करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.