Mumbai-Pune Expressway Tunnel: जानेवारी 2025 मध्ये सुरू होईल मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बोगदा, जाणून घ्या सविस्तर
Mumbai Pune Expressway (Photo Credits: Facebook)

सध्या एमएसआरडीसीने मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) खोपोली ते कुसगाव अशी 19.80 किमीची नवीन मार्गिका (मिसिंग लेन) बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या मार्गावर दोन बोगदे बांधण्यात येत असून, ज्यामुळे प्रवासाचा वेळ बऱ्याच अंशी कमी होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला खंडाळा घाटातील खोळंब्यापासून मुक्त करणाऱ्या दोन्ही बोगद्यांचे पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे. यातील एक बोगदा 1.75 किमी लांबीचा आणि दुसरा 8.93 किमी लांबीचा असेल.

लांबीच्या बाबतीत हे दोन्ही बोगदे भारतातील सर्वात जास्त लांब बोगाद्यांपैकी असतील. यासह रुंदीच्या बाबतीतही ते आशियातील सर्व बोगद्यांना मागे टाकतील. तब्बल 23 मीटर रुंदीचे हे दोन्ही बोगदे भारतासह आशियातील सर्वात रुंद बोगदे असतील. यामध्ये एकूण चार मार्गिका असतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बोगद्यांच्या कामाची डेडलाइन सातत्याने वाढत आहे. लॉकडाऊनमुळे प्रथम त्यांच्या कामात व्यत्यय आला, त्यानंतर मार्च 2024 ची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली. आता या दोन्ही बोगद्यांचे काम जानेवारी 2025 मध्येच पूर्ण होईल, असा अंदाज आहे. या दोन्ही बोगद्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे. द्रुतगती मार्गावरील खोपोली ते सिंहगड इन्स्टिट्यूट हे अंतर 19 किमीवरून 13.3 किमी इतके कमी होणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवासात सुमारे अर्धा तासाची बचत होणार आहे.

या बोगद्याला एक्स्प्रेस वेशी जोडण्यासाठी केबल-स्टेड ब्रिज बांधण्यात येत आहे. त्याच्या महाकाय खांबांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि द्रुतगती मार्ग दोन आणि चार लेन एकत्र धावतात. परंतु आडोशी बोगद्यापासून खंडाळा टोकापर्यंतच्या एक्स्प्रेस वेवर सध्या सर्वाधिक रहदारी असते.  बोगाद्यानंतर या रहदारीपासून लोकांना दिलासा मिळणार आहे. यासोबतच या भागात दरड कोसळून अनेक अपघात झाले आहेत, त्याबाबतही दिलासा मिळणार आहे. (हेही वाचा: Restaurant on Wheels: मध्य रेल्वेच्या यशस्वी 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' संकल्पनेचा विस्तार; राज्यातील 'या' ठिकाणी होणार सुरु)

चीनमधील सध्या शांघाय शहराला चांगक्सिंग बेटाला जोडणारा बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगदा आहे, ज्याची रुंदी 13.7 मीटर आहे. हा 16.62 किलोमीटर लांबीचा बोगदा यांगझी नदीखालून जातो. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा खंडाळा बोगदा यापेक्षा 23 मीटर रुंद असेल.

भारतातील सर्वात लांब बोगदे- 

पिरपंजाल रेल्वे बोगदा 12.2 किमी.

त्रिवेंद्रम बंदर रेल्वे 9.02 किमी.

अटल बोगदा 8.5 किमी.

बेनिहाल बोगदा 8.5 किमी.