तब्बल 2 वर्षानंतर राज्यातील कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे, त्यामुळे सध्या सण-उत्सवही धुमधडाक्यात साजरे होत आहेत. 10 दिवसांचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) यंदा 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या दृष्टीने बीएमसीने (BMC) शहरात हा सण कोणत्याही विघ्नाविना साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस (PoP) पासून बनवलेल्या गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यासाठी नागरी संस्थेने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दरवर्षी, नागरी संस्था मूर्ती विसर्जनासाठी तात्पुरते कृत्रिम तलाव बांधत असते.
मुंबईच्या एफ दक्षिण प्रभाग कार्यालयात सोमवारी एक बैठक झाली जिथे झोन 2 चे उपायुक्त हर्षद काळे म्हणाले की, बीएमसी पुढील वर्षापासून मुंबईत पीओपी मूर्तींच्या खरेदी-विक्रीवर पूर्णपणे बंदी घालणार आहे. केवळ पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींनाच परवानगी असेल. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर निर्बंध उठवल्यानंतर हा उत्सव यावर्षी साजरा केला जाईल आणि म्हणूनच, विशेष बाब म्हणून, नागरी संस्थेने पीओपी निर्मित गणेश मूर्ती वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे लागणार आहे.
त्याचप्रमाणे अशा मूर्तींची सहज ओळख पटण्यासाठी त्यांच्यावर PoP चा स्पष्ट उल्लेख असावा. काळे यांनी नागरिकांनी घरगुती उत्सवासाठी दोन फुटांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती बसवू नये असे आवाहन करून गणेश मंडळांनी किमान उंची ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी काळे यांनी एक खिडकी परवानगी प्रणाली, परवाना विभाग आणि अग्निशमन दलाने दिलेल्या परवानग्यांचाही आढावा घेतला.
दरम्यान, याआधी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक गणेश उत्सव समारंभ समितीसोबत झालेल्या बैठकीत, यंदाच्या गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नसतील असे सांगितले होते. परंतु मूर्तिकारांनी अल्पावधीत दोन कोटींहून अधिक मातीच्या मूर्ती बनवणे शक्य नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर बीएमसीने फक्त यावर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना परवानगी दिली.