मुंबई मध्ये लॉकडाऊन कडक करण्यासाठी लष्कर पाचारण करणार असल्याचं बातम्या निव्वळ अफवा; Mumbai Police कडून स्पष्टोक्ती!
Fake News of Military Being Called in Mumbai

मुंबई शहरामध्ये कोरोनाचा विळखा वाढत असताना लॉकडाऊन देखील वाढवला आहे. परिणामी आरोग्ययंत्रणेसोबतच आता पोलिसांवरही ताण वाढला आहे. मागील दीड महिन्यापासून अहोरात्र पोलिस काम करत आहेत. त्यातच मुंबईत 250 पेक्षा अधिक पोलिसांना कोरोनची बाधा झाल्याने आता मुंबईत लष्काराला पाचरण करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल अशा बातम्या समाजात पसरत होत्या. मात्र काल (7 मे ) रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी अधिकृत ट्वीटर हॅन्डलवरून मुंबईत लष्कर, पॅरामिलिटरी पाचारण करून लॉकडाऊन कडक करणार असल्याचा प्लॅन नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान नागरिकांनी देखील विनाकारण लॉकडाऊनच्या भीतीने किराणामालाचा साठा करून ठेवू नका. असं आवाहन केलं आहे. दरम्यान सध्या केवळ कोरोनाचा सामना करण्यासाठी शांत रहा आणि घरी रहा असं आवाहन मुंबई पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.

18  मे पर्यंत महाराष्ट्रात बीएसएफ जवानांच्या मदतीने महाराष्ट्रात लॉकडाऊन कडक होणार आहे. दरम्यान या काळात दूध, भाजीपाला दुकानं बंद राहणार आहेत असा मेसेज सोशल मीडियामध्ये फिरत आहे. मात्र तो खोटा आहे.

सोशल मीडियामध्ये पसरत असलेला खोटा मेसेज 

 

दरम्यान ट्वीटरवरून मुंबईकरांना आवाहन करताना त्यांनी समाजात खोट्या बातम्या पसरवणार्‍यांना टोला लगावत, 'आम्हांला ठाऊक आहे सध्या अनेकांकडे खूप मोकळा वेळ आहे. पण त्याचा वापर अफवा पसरवण्याऐवजी चांगल्या गोष्टींसाठी करा. तुम्हांला अत्यावश्यक गोष्टींचा साठा करण्याची गरज नाही सोबतच ना आम्ही लष्कर, पॅरामिलिटरी तैनात करत आहोत.सध्या कोरोना संकटासाठी फक्त शांतपणे घरात बसा'.

मुंबई पोलिस ट्वीट

दरम्यान काल मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये राज्य सरकारने विरोधकांसोबत चर्चा करून कोरोना संकटाच्या काळात आव्हानांचा सामना करण्यासाठी उपाययोजनांबद्दल चर्चा केली. त्यावेळेस अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी एसआरपीएफ जवान तैनात करावेत असा विचार देखील मांडण्यात आला आहे. दरम्यान काल मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 11 हजारांच्या पुढे गेला आहे. महाराष्ट्रातही काल एका दिवसांत 1300 पेक्षा रूग्ण आढळले आहेत. मात्र ही वाढती संख्या टेस्ट वाढवल्याने वाढत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. सध्या देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे रेड झोन मध्ये असलेल्या भागात पुढील काही दिवस संचारबंदीचे नियम कडकच असतील.