Coronavirus: मराठी मुलांना रोजगाराची संधी द्या; महाराष्ट्र सोडून गेलेल्या परप्रांतीयांना कोरोना चाचणीशिवाय राज्यात प्रवेश देऊ नका- राज ठाकरे
MNS Chief Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक संपली. या बैठकीत विरोधी पक्ष नेत्यांनी विविध सूचना सरकारला केल्या. आपली भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. या बैठकीत सूचवलेल्या सूचना आणि मांडलेली भूमिका याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माहिती दिली. दिड महिना अहोरात्र काम करुन महाराष्ट्र पोलीस थकले आहेत त्यामुळे त्यांना काहीसी विश्रांती मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये एसआरपीएफची फलटण लावावी. जे परप्रांतीय कामगार महाराष्ट्र सोडून बाहेर जात आहेत. ते परत येताना त्यांची कोरोना व्हायरस चाचणी केल्याशिवाय त्यांना महाराष्ट्र प्रवेश देऊ नये. तसेच, राज्यात रिक्त झालेल्या रोजगाराच्या जागा, संधी मराठी मुलांना सरकारने कळवाव्यात, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले, कोरोना व्हायरस संकट असताना दवाखाने बंद आहेत. सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच्या किंवा कोरकोळ आजारांसाठी कोठे जावे हेही कळत नाही. त्यासाठी सरकारने छोटे छोटे दवाखाने सुरु करावेत. अशा दवाखान्यांजवळ एकदोन पोलीस तैनात करावेत. जेणेकरुन गर्दी होणार नाही. इतर समस्या निर्माण होणार नाहीत. यासोबतच स्पर्धा परीक्षांसाठी जे तरुण शहरात आले आहेत त्यांची काळजी घ्यावी. त्यांना स्वगृही परतण्यासाठी सरकारने पावले उचलावीत.

परप्रांतीय तरुण, कामगार परत महाराष्ट्रात येताना त्यांची कोरोना चाचणी झाल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात प्रवेश देऊ नये. तसेच त्यांची राज्य स्थलांतरण कायद्याखाली नोंदणी करावी. कारण, नंतर ते करता येणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. याशिवाय महाराष्ट्रात जिथेजिथे कामाची संधी आहे तिथेल्या रोजगारांची नोंद करुन मराठी मुलांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा. शाळा सुरु करण्याबाबत धोरण ठरवावे. त्या सुरु करताना नेमक्या कोणत्या प्रकारे करणार आहात ते विद्यार्थी, पालकांना सांगा, अशी भूमिकाही राज ठाकरे यांनी बैठकीत मांडल्याचे सांगितले.

दरम्यान, महापालिका कर्मचारी, सफाई कामगार आदींसाठी सुरक्षा कवच द्यावे. तसेच, लॉकडाऊन हटवताना त्याची नेमकी तयारी काय? तो कसा काढणार आहात? लॉकडाऊन काढण्यापूर्वी किमान 10 ते 15 दिवस नागरिकांना कळविण्यात यावे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.