
मुंबई मेट्रो लाईन 9 (Mumbai Metro Line 9) ही दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर या मार्गावर धावणारी विस्तारित मेट्रो लाईन असून, सध्या ती बांधकामाच्या अंतिम टप्प्यात आहे. ही 11.38 किलोमीटर लांबीची पूर्णपणे उन्नत (एलिव्हेटेड) मेट्रो लाईन असून, ती 8 स्थानकांसह मुंबईच्या उपनगरांना मीरा-भाईंदरशी जोडेल. या मेट्रो लाईनच्या ट्रायल रन तयारी जोरात सुरू आहे, आणि 10 मे 2025 पासून दहिसर ते काशीगाव या पहिल्या टप्प्यासाठी विद्युत पुरवठा सुरू होणार आहे. या मेट्रो लाईनच्या प्रगतीमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्याची आणि प्रवास वेळेत बचत होण्याची अपेक्षा आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या महिन्यात या मेट्रो मार्गावर चाचणी सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. मेट्रो-9 कॉरिडॉरच्या 4.973 किमी मार्गावर चाचणी सुरू करण्यासाठी शनिवार, 10 मे पासून वीजपुरवठा सुरू केला जाईल. या मार्गावर वीजपुरवठा सुरू केल्यानंतर आणि आवश्यक तपासणी केल्यानंतर, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मेट्रोची चाचणी सुरू होऊ शकते. या मार्गावरील मेट्रोचे दरवाजे वर्षाच्या अखेरीस जनतेसाठी खुले होऊ शकतात.
संपूर्ण मार्गाचे बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे, एमएमआरडीएने 13.5 किमी मार्गावर एकाच वेळी सेवा सुरू करण्याऐवजी दोन टप्प्यात सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. पहिल्या टप्प्यात, दहिसर (पूर्व) आणि काशीगाव मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात 4,973 किमी मार्गावर चार स्थानके आहेत. मेट्रो-9 कॉरिडॉरच्या संपूर्ण मार्गाचे बांधकाम 95 टक्के पूर्ण झाले आहे. मेट्रो लाईन 9 ही मेट्रो लाईन 7 चा विस्तार आहे, जी अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) पर्यंत धावते.
ही लाईन दहिसर (पूर्व) येथून सुरू होऊन पांडुरंग वाडी, मिरागाव, काशीगाव, साई बाबा नगर, मेदितिया नगर, शहीद भगतसिंग गार्डन आणि सुभाषचंद्र बोस स्टेडियम या स्थानकांवर थांबेल. ही लाईन पश्चिम द्रुतगती महामार्ग (Western Express Highway), पश्चिम रेल्वे आणि मेट्रो लाईन 2A आणि 7 शी जोडली जाईल, ज्यामुळे प्रवाशांना एकत्रित प्रवासाचा अनुभव मिळेल. या लाईनची एक खास वैशिष्ट्य म्हणजे ती दुहेरी पूलावर (डबल-डेकर ब्रिज) धावेल, ज्यामध्ये खालच्या स्तरावर उड्डाणपूल आणि वरच्या स्तरावर मेट्रो रुळ असेल. हा उड्डाणपूल शिवाजी चौक (मीरा रोड) येथून भाईंदर (पश्चिम) पर्यंत असेल. (हेही वाचा: महाराष्ट्रात पुन्हा धावणार पारंपारिक 3 x 2 आसन व्यवस्था असणाऱ्या बसेस; MSRTC ने दिली नवीन गाड्या खरेदीस मान्यता, 204 स्थानकांवर सुरु होणार ATM ची सुविधा)
ट्रायल रनदरम्यान रुळ, सिग्नलिंग, विद्युत पुरवठा, आणि स्थानकांवरील सुविधा यांची तपासणी केली जाईल. या चाचण्या यशस्वी झाल्यावर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) यांच्याकडून अंतिम मंजुरी घेतली जाईल, ज्यानंतर प्रवासी सेवेला सुरुवात होईल. संपूर्ण लाईन डिसेंबर 2025 पर्यंत कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे. मेट्रो-9 चे कारशेड अद्याप तयार झालेले नाही. यामुळे, एमएमआरडीएने चारकोप डेपोमधून मेट्रो-9 रेकची देखभाल करण्याची योजना आखली आहे. सध्या, मेट्रो-7 आणि मेट्रो-2ए कॉरिडॉरचे रेक चारकोप डेपोमधून देखभाल केले जातात.