Vijay Wadettiwar (Photo Credits: FB)

Vijay Wadettiwar on Mumbai Local: मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई काही कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याचं गुरुवारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होतं. अशातचं आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुंबई लोकलसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे, या पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मुंबई लोकल बंद होणार नाही, मात्र कठोर निर्बंध नक्कीचं लावण्यात येईल, असं स्पष्टीकरण वडेट्टीवार यांनी दिलं आहे.

मुंबई लोकल बंद होणार नाही. परंतु, प्रवाशांची विभागणी करण्यात येईल. लोकल बंद होणार नाही, पण निर्बंध लावण्यात येतील. लॉकडाऊन सामान्य जनतेला परवडणार नाही. निर्बंध लागतील पण लॉकडाऊन नाही, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. (वाचा - महाराष्ट्र: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोविड परिस्थितीबाबत आज राज्यातील अधिका-यांसोबत घेणार उच्चस्तरीय बैठक)

तरुणांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ही निश्चितचं चिंतेची बाब आहे. कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे अतिरिक्त बेडची सुविधा असणे गरजेचे आहे, त्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे, असंही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी नमूद केलं.