Mumbai local train | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोरोना महामारीमुळे (Coronavirus) अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह आता महिलांनाही लोकलमधून (Mumbai Local Trains) प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे लोकल सरसकट सगळ्यांसाठी कधी सुरु होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सर्व सामान्यांनाही लोकलमधून प्रवास करता येणार आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सकारत्मक आहेत, असेही ते म्हणाले आहेत. यासंदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे.

लॉकडाऊनमध्ये बंद झालेली मुंबई लोकल जवळपास अडीच महिन्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता नवरात्रीमध्ये महिलांनाही लोकलमधून प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे. मात्र, अद्यापही सामान्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली नाही. यामुळे लोकल सरसकट सगळ्यांसाठी कधी सुरु होणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याबाबत आता विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सामान्यांसाठी लोकल ट्रेन सेवा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. हे देखील वाचा- Maharashtra SOPs For International Passengers: कोरोना व्हायरस New Strain धोक्याच्या पार्श्वभूमीवर युरोप, दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्वेकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने जारी केली नियमावली

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला होता. दरम्यान, उद्योगधंदे, व्यवसाय आणि वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु, राज्यात अनलॉकच्या अंतर्गत टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टींना सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हेतर राज्य सरकारकडून नागरिकांसाठीही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांना मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे बंधकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करताना आढळणाऱ्या नागरिकांकडून दंड आकारण्यात येत आहे.

महाराष्ट्रात बुधवारी 3 हजार 913 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7 हजार 620 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 18 लाख 1 हजार 700 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 54 हजार 573 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.51% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.