Mumbai Local: गर्दीमुळे लोकलमधून पडून झालेला मृत्यू अपघातच, मुंबई हायकोर्टाचे भरपाई देण्याचे दिले आदेश

Mumbai Local: मुंबईची लाइफलाइन म्हणून मुंबई लोकलची ओळख आहे. मात्र, गर्दीमुळे धावत्या ट्रेनमधून (Mumbai News) प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकल ट्रेनमधून लाखो लोक प्रवास करत असतात. त्यामुळे लोकलला प्रचंड गर्दी असते. गर्दीमुळे लोकलमधून पडून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. आता त्यावर आधारीतच मुंबई हायकार्टाने मोठा निर्णय दिला आहे. आता गर्दीमुळे लोकलमधून पडून झालेला मृत्यू हा अपघातच असल्याचे मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) स्पष्ट केले आहे. त्याशिवाय, या अपघाताची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असून भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.(हेही वाचा:Mumbai Local Train: सीएसएमटी स्थानकात प्रवेश करताना लोकल रुळावरुन घसरली; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत)

गर्दीमुळे जर एखाद्याचा लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू होत असेल तर तो अपघातच असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची भरपाई देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्याचसोबत तीन महिन्यात भरपाई दिली नाही तर १२ टक्के व्याजदराने रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशारा देखील कोर्टाने दिला आहे. त्यामुळे या अपघाताची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असण्यावर शिक्का मोर्तब झाला आहे.

लोकल ट्रेनमधून पडून दोन महिन्यांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ११ मे रोजी लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झाला होता. कल्याणवरून सीएसएमटीकडे जलद लोकलने जात असताना ही घटना घडली. मुंब्रा- कळवा स्थानकादरम्यान पारसिक बोगद्याजवळ लोकलमध्ये पडून २८ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. त्याआधी नातेवाईकांच्या घरी जाण्यासाठी आपल्या आईसोबत निघालेल्या तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला होता.