सध्या मुंबईमध्ये (Mumbai) व्यापक प्रमाणात कोरोना विषाणू लसीकरण (Corona Vaccination) सुरु आहे. बीएमसी (BMC) सध्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन या दोन लसी नागरिकांना देत आहे. आता कोविन संकेतस्थळावर यशस्वी नोंदणी केलेल्या नागरिकांनी, प्रतीक्षा न करता नजीकच्या रूग्णालयात थेट जाऊन कोविड-19 प्रतिबंधात्मक लस घ्यावी असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. त्यासाठी मुंबईत शासकीय, मनपा रूग्णालयांसह 59 खासगी रूग्णालयांमध्येही लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. यासह नोंदणी केली नसल्यास रुग्णालयात जाऊन, नोंदणी करुन लस घेण्याचीही मुभा देण्यात आली आहे.
कोविड-19 संसर्गजन्य आजाराची प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यानंतर, पात्र नागरिकांना लस घेता यावी, यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईत महानगरपालिकेच्या तसेच शासनाच्या रुग्णालयांमध्ये निःशुल्क तर सद्यस्थितीत एकूण 59 खासगी रुग्णालयांमध्येही रुपये 250 या दराने सशुल्क लसीकरणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. कोविन अॅपवर लसीकरणासाठी यशस्वी नोंदणी केलेल्या नागरिकांनी लसीकरणाच्या दिनांकाची वाट न पाहता, नजीकच्या रुग्णालयांमध्ये थेट जाऊन लस घ्यावी, तसेच नोंदणी केली नसेल तरी नजीकच्या रुग्णालयात जाऊन नोंदणी करावी व तेथे लस घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
भारतात व मुंबईत कोविड-19 या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना कार्यान्वित केलेल्या आहेत. कोविड-19 या संसर्गजन्य आजारावर खात्रीशीर औषध नसल्यामुळे विलगीकरण-अलगीकरण करण्यासह सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे, सॅनिटायजरचा उपयोग करणे किंवा हात वारंवार धुणे या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यासोबतच आता कोविड-19 प्रतिबंधासाठी लस उपलब्ध झाली असून आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी सदर लसीकरणाचा वेग वाढविणे अनिवार्य आहे. या संदर्भात शासनाने 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच 45 ते 59 या वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी लसीकरण करण्यासंदर्भात उपाययोजना केल्या आहेत.
या अनुषंगाने नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येते की, वरील नमूद वयोगटातील लाभार्थ्यांनी ‘कोविन’ या संकेतस्थळावर यशस्वी नोंदणी करुन याद्वारे घेण्यात आलेल्या लसीकरणाच्या दिनांकाची वाट न पाहता नजीकच्या लसीकरण केंद्रात थेट जाऊन कोविड-19 प्रतिबंधात्मक लस घ्यावी. तसेच, ज्या पात्र नागरिकांनी कोविन अॅपवर लसीकरणासाठी नोंदणी केली नसेल, त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करुन घ्यावी आणि त्यानंतर त्यांनी तेथेच लस घ्यावी. नोंदणी व लसीकरण या दोन्ही प्रक्रिया विचारात घेता, त्यासाठी थोडा अवधी लागू शकतो.