अवयवदान (Photo Credits : Max Pixel)

मुंबई (Mumbai) च्या केईएम हॉस्पिटल (KEM Hospital) मध्ये या शहरातील पहिलं हात दान झालं आहे. बुधवारी (11ऑगस्ट) शहरामध्ये एका तरूण ब्रेन डेड व्यक्तीच्या सारे अवयव दान करण्याच्या निर्णयामुळे 5 जणांना फायदा होणार आहे. तर पहिल्यांदाच हात प्रत्यारोपणासाठी हात दान होत आहे. नक्की वाचा:  दूर करा अवयव दानाबाबतचे हे '5' समज -गैरसमज.

TOI च्या रिपोर्ट्सनुसार, एका तरूण व्यक्तीच्या कुटुंबाने हात दान करण्यासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान या कुटुंबाला व्यक्तीचं नाव, लिंग जाहीर करायचे नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हात प्रत्यारोपण ही अत्यंत किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. याकरिता अंदाजे 18-24 तासांची शस्त्रक्रियेची प्रक्रिया आहे. यामध्ये दोन मुख्य धमन्या, सहा शिरा, आठ नसा आणि 12 टेंडन्स आणि हाडे जोडली जाणार आहेत. दरम्यान केईएम चे डीन डॉ. हेमंत देशमुख यांनी या शस्त्रक्रियेवर भाष्य टाळत या बाबत आताच बोलणं घाईचं होणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईच्या मोनिका मोरे वर यापूर्वी हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. परेलच्या ग्लोबल हॉस्पिटल मध्ये झालेली ही प्रक्रिया यशस्वी होती पण त्याकरिता चैन्नई मधून हात आणण्यात आले होते. नक्की वाचा: पुण्याच्या गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये गर्भाशय प्रत्यारोपणाचा प्रयत्न यशस्वी, चिमुकलीचा जन्म, आशियातील पहिली यशस्वी प्रसुती.

सध्या कोरोना संकटामध्ये अवयदान प्रक्रिया देखील मंदावली होती पण आता हळूहळू त्याला चालना मिळत आहे. मागील आठवडाभरामध्ये 3 अवयव दान झाले आहेत. तर मागील 8 महिन्यात 54 शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.

हात दान केलेल्या व्यक्तीने अवयवदान केले आहे. त्याला ब्रेन हॅमरेज झाल्याने काही दिवसांतच डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड म्हणून जाहीर केले. नंतर त्याच्या कुटुबियांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतला आहे. या व्यक्तीची फुफ्फुसं हैदराबादला पाठवण्यात आली आहेत. तर यकृत, किडनी शहरातच अंतिम टप्प्यातील ऑर्गन फेल्युअर व्यक्तीसाठी वापरलं जाईल.