चीननंतर भारतातही ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसच्या (HMPV) आगमनामुळे चिंता वाढू लागली आहे. आता मुंबईत (Mumbai) या विषाणूचे पहिले प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात सहा महिन्यांच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. बेंगळुरू, नागपूर, तामिळनाडू येथे प्रत्येकी दोन तर पश्चिम बंगाल, अहमदाबाद आणि मुंबई येथे प्रत्येकी एक प्रकरण नोंदवण्यात आले आहे. नोव्हेंबरमध्ये कोलकाता येथे या विषाणूचे एक प्रकरण समोर आले होते. त्या ठिकाणी सहा महिन्यांच्या मुलाला या विषाणूची लागण झाली होती.
मुंबईत ज्या मुलीबाबत एचएमपीव्हीचे प्रकरण समोर आले आहे ती फक्त सहा महिन्यांची आहे. माहितीनुसार, 1 जानेवारीला तिला गंभीर खोकला, छाती जड होणे आणि ऑक्सिजनची पातळी 84 टक्क्यांपर्यंत घसरल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी नवीन रॅपिड पीसीआर चाचणीद्वारे पुष्टी केली की, तिला एचएमपीव्हीची लागण झाली आहे. त्यानंतर मुलीवर आयसीयूमध्ये ब्रॉन्कोडायलेटर्ससारख्या औषधांसह उपचार करण्यात आले आणि पाच दिवसांनी तिला रुग्णालयातून सोडण्यात आले.
अशात बीएमसीच्या आरोग्य विभागाने सांगितले की त्यांना या प्रकरणाचा कोणताही अहवाल मिळालेला नाही, परंतु ते इन्फ्लूएंझा आणि गंभीर श्वसन संक्रमणाबाबत सतर्क आहेत. डॉक्टर सांगत आहेत की, एचएमपीव्ही मुख्यत्वे मुले आणि वृद्धांना अनेक काळापासून प्रभावित करत आहे, परंतु यामुळे कोविड सारखी महामारी होऊ शकत नाही. (हेही वाचा: HMPV Virus in India: कर्नाटक आणि गुजरातपाठोपाठ तामिळनाडूच्या चेन्नई आणि सालेममध्ये ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचे आढळले दोन रुग्ण)
ह्युमन मेटाप्युमोव्हायरस किंवा एचएमपीव्ही हा एक विषाणू आहे, ज्यामुळे मानवी फुफ्फुस आणि श्वसनमार्गामध्ये संसर्ग होतो. यामुळे सामान्य सर्दी किंवा फ्लू सारखी स्थिती निर्माण होते. सतत खोकला, वाहणारे नाक, ताप, घसा खवखवणे अशी लक्षणे दिसतात. आधीच आजारी असलेल्या किंवा ऍलर्जीने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये या विषाणूचा संसर्ग सामान्य आहे. केंद्र सरकारने याबाबत एक ॲडव्हायजरी जारी केली असून, याला घाबरण्याची गरज नाही आणि राज्य सरकारांनीही सतर्क राहावे, असे म्हटले आहे.