मुंबईमध्ये (Mumbai) अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गेल्या दोन महिन्यांत तब्बल 137 हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटना सुधारणा नोटिसा पाठवल्या आहेत. यापैकी 15 हॉटेलांना त्यांचे काम बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एफडीएला अचानक तपासणी करताना अशा हॉटेल्समध्ये मोठ्या त्रुटी आढळून आल्यानंतर त्यांचे काम थांबवण्यास सांगितले आहे. याशिवाय, विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 1,70,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सुधारणा नोटिसा बजावलेल्या हॉटेलांना त्यांच्या जेवणाचा दर्जा सुधारण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे अन्यथा त्यांना त्यांचे कामकाज बंद करण्यास सांगितले जाईल. रेस्टॉरंट किंवा भोजनालये अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत की नाही हे पाहण्यासाठी मुंबईभर अचानक छापे टाकले जात आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त शैलेश आढाव म्हणाले की, या छाप्यांची दखल घेत रेस्टॉरंटना किंवा हॉटेल्सना कामकाज थांबवण्याची किंवा सुधारणा करण्याची नोटीस बजावली जात आहे. आढाव पुढे म्हणाले की, त्यांनी दोन महिन्यांत शहरातील 152 भोजनालयांवर अचानक छापे टाकले आहेत. त्यापैकी 131 जणांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या, तर 15 जणांना काम बंद किंवा बंद करण्यास सांगण्यात आले.
तपासणीच्या वेळी त्यांच्या लक्षात आले की मुंबईतील बहुतेक रेस्टॉरंट्स किंवा भोजनालयांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे. घाणेरडे स्वयंपाकघर, उघडे डस्टबिन, शिळे अन्न, शिवाय कर्मचारी टोपी आणि हातमोजेशिवाय काम करतात अशा अनेक गोष्टी दिसून आल्या, जे एफडीएच्या नियमांच्या विरुद्ध आहे. याआधी सप्टेंबरमध्ये शहरातील प्रसिद्ध भोजनालय बडेमियाच्या तीन आउटलेटला एफडीएने काम थांबवण्याची नोटीस दिली होती. हे फूड जॉइंट्स फूड लायसन्सशिवाय सुरू असल्याचे आढळून आले होते. (हेही वाचा: Navi Mumbai Metro Inauguration: तब्बल 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवी मुंबईला लवकरच मिळणार पहिली मेट्रो; दसऱ्यानंतर लोकार्पण होण्याची शक्यता)
या पुढेही फूड सेफ्टी इन्स्पेक्टर्स (FSOs) शहरातील रेस्टॉरंट्सना भेट देत राहतील आणि भोजनालये अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, 2006 च्या नियमांचे पालन करत आहेत की नाही हे तपासले जाईल. शहरात 18,481 नोंदणीकृत भोजनालये आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.