राज्यासह मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक तुफान वाढत चालला आहे. त्यामुळे कठोर लॉकडाऊनचे निर्बंध शहरात येत्या 30 एप्रिल पर्यंत लागू करण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना सुद्धा कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन केले जात आहे. त्याचसोबत नागरिकांना कोरोनाच्या लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन केले जात आहे. शासकीय रुग्णालयात नागरिकांना कोरोनाची मोफत लस दिली जात आहे. तर खासगी रुग्णालयात पैसे मोजून लस घ्यावी लागत आहे. याच पार्श्वभुमीवर खोटे COVID19 चे रिपोर्ट्स देणाऱ्या एका लॅब टेक्निशियनला अटक करण्यात आली आहे.
मिरा भायंदार वसई विरार गुन्हे शाखेकडून बुधवारी खोटे कोविड19 चे रिपोर्ट्स बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये लॅब टेक्निशयनला अटकर करण्यात आली असून तो खोटे कोविड19 चे निगेटिव्ह रिपोर्ट्स तयार करुन देत असे. त्याचसोबत प्रत्येकाचे आधार कार्ड रिपोर्ट्ससाठी वापरुन त्यांच्याकडून 1 हजार रुपये सुद्धा घेत होता. पोलिसांना त्याच्या मोबाईल मध्ये जवळजवळ 156 कोरोनाचे रिपोर्ट्स मिळाले. हे सर्व रिपोर्ट्स खोटे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी महेश पाटील यांनी असे म्हटले की, प्रत्येक कोरोनाच्या रिपोर्ट संदर्भात तपास केला जात आहे.(Pune: बाबो! खोट्या डिग्रीच्या सहाय्याने कंपाऊंडर बनला डॉक्टर; चालवत होता कोविड वॉर्डसह Multi-Specialty Hospital, पुण्यात अटक)
कृष्णा सरोज असे आरोपीचे नाव असून तो कांदिवली मधील लाजीपाडा येथे राहणार आहे. सरोज याने 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतले असून तो SRL डायग्नोस सेंटरमध्ये काम करतो असे पोलिसांनी सांगितले आहे. तर पोलिसांना सरोज नावाचा व्यक्ती खोटे कोरोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट्स तयार करुन देत असल्याची टीप मिळाली. माहिती मिळताच तासाभरातच त्याच्या क्लाइंट्सच्या आधार कॉपी मिळाल्या. त्यानंतर पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला त्याच्याकडे पाठवले असता सरोज याला अटक करण्यात आली.