सध्याच्या कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीच्या काळात डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवा यांचे महत्व कित्येक पटीने वाढले आहे. डॉक्टर्सना तर देव मानून पूजले जात आहे. अशात पुण्याच्या (Pune) शिरूरमधून (Shirur) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एक 31 वर्षीय कंपाऊंडर बनावट डिग्रीच्या सहाय्याने डॉक्टर बनून दोन वर्षांपासून 22 बेड्सचे रुग्णालय चालवीत होता. एवढेच नव्हे तर आरोपीने कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डही बनविला होता, जिथे अशा रुग्णांवर उपचार केले जात होते. आरोपी बनावट पदवी आणि खोटी ओळख धारण करून, हे रुग्णालय चालवत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मेहबूब फारुख शेख (Mehboob Farukh Shaikh) असे या व्यक्तीचे खरे नाव आहे. आरोपीने रुग्णालय चालविण्यासाठी एका माणसाबरोबर भागीदारी केली होती. त्यानंतर पैशांबाबत दोघांमध्ये वाद झाला आणि प्रकरण पोलिसांकडे गेले. त्यावेळी सत्य उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला आणि हा सारा मामला समोर आला. पोलिसांनी सांगितले की आरोपीचे नाव मेहबूब शेख असून तो डॉक्टर महेश पाटील यांच्या नावावर बनावट पदवी घेऊन मौर्य हॉस्पिटल चालवत होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. आरोपी हा नांदेडचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी पूर्वी नांदेडमधील डॉक्टरांकडे कंपाऊंडर म्हणून काम करत होता. त्यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण एक डॉक्टर म्हणून काम करू शकतो असा आत्मविश्वास त्याच्यात आला. पुढे मग त्याने बनावट मार्गाने हॉस्पिटल चालवण्याचा विचार केला. या कामात त्याने एका व्यक्तीलाही घेतले. (हेही वाचा: जामखेडमध्ये खाजगी रुग्णालयात रेमडेसीवीर च्या तुटवट्यावर मात करत डॉक्टरांनी राबवली खास उपचार पद्धती; 'मॉडेल उपचार पद्धती' म्हणून विचार व्हावा यासाठी रोहित पवारांचे पत्र)
आता आरोपीविरोधात फसवणूकीसह महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करत आहेत की, आरोपीला रुग्णालय चालविण्यासाठी बनावट प्रमाणपत्रे व आधार कार्ड व इतर कागदपत्रे कोठून मिळाली. तसेच त्याने या रुग्णालयात उपचार दिल्या गेलेल्या रुग्णांबाबतही तपास होणार आहे.