Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील धारावीत (Dharavi) कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचे दिसून येत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून धारावीत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले होते. त्याचसोबत धारावीतील मृतांचा आकडा सुद्धा घटल्याचे दिसून आले आहे. काल धारावीत फक्त 2 रुग्ण आढळुन आल्यानंतर आज 9 रुग्ण आढळले आहेत. यामुळे धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2,540 वर पोहचल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. तर 98 अॅक्टिव रुग्ण धारावीत आहेत.धारावीत दाटीवाटीने लोकवस्ती असल्याने कोरोनाच्या सुरुवातीला येथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे मुश्किल होते. परंतु महापालिकेकडून या क्षेत्रात योग्य ती खबरदारी घेण्यास नागरिकांची स्क्रिनिंगच्या माध्यमातून चाचणी सुद्धा करण्यात आली.

राज्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी करण्याकडे सरकार विशेष लक्ष देत आहे. त्याचसोबत रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून ऑक्सिजन युक्त असलेल्या बेड्सची सुविधेसह क्वारंटाइन सेंटर्सची उभारणी करण्यात येत आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने डॉक्टर्स, नर्स, वैद्यकिय कर्मचारी रुग्णांवर अहोरात्र उपचार करुन त्यांची प्रकृती सुधरावत आहेत. तसेच राज्यात कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. मात्र उर्वरित ठिकाणी 'मिशन बिगिन अगेन' नुसार काही गोष्टी अनलॉकिंगनुसार सुरु करण्यास सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे.(Jumbo COVID19 Hospitals In Pune: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश)

महाराष्ट्रात काल तब्बल 9 हजार 431 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 75 हजार 799 वर पोहचली आहे. यापैकी 2 लाख 13 हजार 238 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, राज्यात सध्या 1 लाख 48 हजार 601 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत.