मुंबईतील धारावीत आणखी कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आल्याची महापालिकेची माहिती
Coronavirus (Photo Credits: PTI)

मुंबईत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला दाटीवाटीने लोकवस्ती असलेल्या धारावीने या कोरोनावर नियंत्रण मिळवल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले होते. तर धारावीत कोरोनाच्या रुग्णांचा वाढीव रेट ही कमी होण्यासह आज आणखी फक्त 6 संक्रमितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे धारावीत सध्या कोरोनाचे एकूण 107 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.(पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासात आणखी 323 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 11,403 वर पोहचला)

धारावीत सध्या कोरोनाचे एकूण रुग्ण फक्त 2 हजारांच्या पटीत आहेत. तसेच नव्याने कोरोनामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी सुद्धा गेल्या काही दिवसात समोर आलेली नाही. महापालिकेकडून सातत्याने धारावीत कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रणासह योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांना सुद्धा स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे. धारावी पॅटर्न हे जगासाठी उत्तम उदाहरण ठरेल असे ही मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.(कोरोना व्हायरसच्या संदर्भातील कामांचा आढावा घेण्यासाठी शरद पवार 19 जुलैला सोलापूर दौऱ्यावर)

दरम्यान, मुंबईसह पुणे, ठाणे, नवी मुंबईसह आता पालघर येथे ही कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश स्थानिक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी महापालिकेने पीएम केअर्स फंडच्या माध्यमातून केंद्राकडून राज्याला 446 व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती दिली होती. हे सर्व व्हेंटिलेटर्स एकत्रितपणे नव्हे तर टप्प्याटप्प्याने देण्यात आलेले आहेत. केंद्राकडून देण्यात आलेले हे व्हेंटिलेटर्स विविध कोविडच्या रुग्णालयात पुरवले जात असल्याचे ही महापालिकेने स्पष्ट केले आहे.