महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाचं राज्यपालांच्या भेटीनंतर महाविकास आघाडी वर टीकास्त्र; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मौन चिंताजनक: देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis | Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून गृहमंत्री अनिल देशमुख (HM Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केलेल्या माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब चे धमाके राज्यात अजूनही जाणवत आहेत. राज्याचे विधानसभा विरोधी नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलिस अधिकार्‍यांच्या बदलीमध्ये 'हफ्तेखोरी' होत असल्याचा गंभीर आरोप करत त्याचे पुरावे केंद्रीय गृहसचिवांना दिल्यानंतर आज महाराष्ट्रात त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत भेट घेतली आहे. यावेळी कोरोना ते सध्याची राजकीय, कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत काही महत्त्वाच्या महत्त्वाच्या गोष्टी निदर्शनास आणून देणारे एक पत्र दिले आहे. दरम्यान यामध्ये 100 विविध प्रकरणांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे.

महाराष्ट्र राजभावनात भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर भाजपा शिष्टमंडळाने एक पत्रकार परिषद घेतली. यावेळेस सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार वर हल्लाबोल केला आहे. त्यामध्ये फडणवीस यांनी बोलताना महाविकास आघाडीने राजकीय नैतिकता तुडवल्याचं म्हटलं आहे. शरद पवार देखील दिल्लीला पत्रकार परिषदा घेतात पण त्या देखील स्वतःच्या मंत्र्यांची पाठराखण करण्यासाठी आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अद्याप काहीच बोलले नाहीत त्यांचं मौन चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया देखील देवंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाविकास आघाडीतील तिसरा घटक कॉंग्रेस या सार्‍यामध्ये अस्तित्वहीन आहे. त्यांचे केंद्रातील आणि राज्यातील नेते वेगवेगळी भूमिका मांडत आहेत. त्यामुळे या सार्‍यामध्ये कॉंग्रेसला किती हिस्सा मिळतो हे देखील उघड करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. Devendra Fadnavis at MHA: महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणांची चौकशी सीबीआयद्वारे करा, अन्यथा कोर्टात जाऊ- देवेंद्र फडणवीस.

ANI Tweet

आज राजभावनावर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आदी नेते उपस्थित होते.