Mumbai Controversial Posters of Uddhav Thackeray, Prakash Ambedkar: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या प्रतिमा असलेले एक वादग्रस्त पोस्टर (Mumbai Controversial Posters) मुंबईत झळकले आहे. या पोस्टरवर असलेला कथीत औरंजेब (Aurangzeb) याचा फोटो आणि त्यावर लिहिलेला मजकूर वादग्रस्त होता. अशा प्रकारचे पोस्टर झळकल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत हे पोस्टर हटविण्यात आले आहे. हे पोस्टर नेमके कोणी झळकवले याबाबत माहिती मिळू शकली नाही. हे पोस्टर मुंबईच्या माहिम परिसरात असलेल्या केसरी टूर्स कार्यालयासमोर अज्ञाताकडून मध्यरात्री लावण्यात आले होते. कोणीतरी खोडसाळपणा करुन हे पोस्टर लावले असावे हे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत हे पोस्टर हटवले.
सध्या हे पोस्टर हटविण्यात आले असले तरी सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून या पोस्टरचे फोटो, व्हिडिओ वार्तांकनासाठी वापरण्यात आले आहेत. लेटेस्टली मराठी या पोष्टरची पुष्टी करत नाही. दरम्यान, या पोस्टरवर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करत "औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे" असा वादग्रस्त उल्लेख होता. तसेच पोस्टरवर मजकुराखाली #UddhavThackerayForAurangzeb म्हणजेच औरंगजेबासाठी उद्धव ठाकरे असा हॅशटॅगही छापण्यात आला होता. (हेही वाचा, उद्धव ठाकरे यांची घोषणा, Aaditya Thackeray यांच्या नेतृत्वात शिवसेना (UBT) चा मुंबई मनापावर विराट मर्चा)
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कोणीतरी हे पोस्टर मध्यरात्रीच्या वेळी लावण्यात आले असावे, असे बोलले जात आहे. वादग्रस्त पोस्टरमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. हे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने हे पोस्टर सकाळी हटविले. पोलिसांनी सदर पोस्टरवरुन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद येथे जाऊन औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. ही भेट राज्यभरात वादग्रस्त ठरली होती. त्यावरुन राजकारण तापले असतानाच आता हे पोस्टर झळकले आहे.