Coastal Road | (Photo Credits: BMC/Website)

मुंबई शहरातील कोस्टल रोड हा नागरिकांसाठी वरदान ठरला आहे. यामुळे मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका झाली आहे, तसेच प्रवासाचा वेळही कमी झाला आहे. आता मुंबई महापालिका कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील (Mumbai Coastal Road Phase 2) वर्सोवा-भाईंदर लिंक रोड प्रकल्पाच्या कामाला गती देत आहे. मुंबई कोस्टल रोड फेज 2 हा मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी उभारला जात आहे. या टप्प्यात वर्सोवा ते दहिसर या 22.93 किलोमीटर लांबीचा मार्ग आणि दहिसर ते भायंदर या 5.6 किलोमीटरचा उंच रस्ता (दहिसर-भायंदर लिंक रोड) यांचा समावेश आहे.

या वर्सोवा-भाईंदर लिंक रोडच्या बांधकामासाठी 104 हेक्टर वनजमिनीचा वापर केला जाईल. विकास आराखड्याअंतर्गत, वर्सोवा भाईंदर रस्ता प्रस्तावित आहे आणि रस्त्याच्या बांधकामासाठी, प्रभावित वीजवाहिन्यांचे स्थलांतर आणि इतर कामांसाठी, 103.6554 हेक्टर वनजमिनीचा वापर केला जाणार आहे, असे बीएमसीने जारी केलेल्या सार्वजनिक सूचनेत म्हटले आहे. यासह कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मार्ग मोकळा करताना, तब्बल 9 हजार खारफुटीची झाडे तोडली जातील आणि आणखी 51,000 खारफुटीची झाडे प्रभावित होतील.

या प्रकल्पाला पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून किनारी नियमन क्षेत्र मंजुरी मिळाली आहे. सरकारने अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वनवासी कायदा 2006 आणि 2008, सुधारणा नियम 2012 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्याअंतर्गत कोणत्याही बाधित व्यक्तीला आक्षेप नोंदवायचे असतील तर ते 21 एप्रिलपर्यंत वॉर्ड कार्यालयात जाऊन आक्षेप नोंदवू शकतात, असेही नोटीसच्या दिवशी म्हटले आहे.

आर-सेंट्रल वॉर्डच्या सहाय्यक महानगरपालिका आयुक्त संध्या नांदेडकर म्हणाल्या, बोरीवलीतील गोराई येथे सुमारे 4 हेक्टर जमीन येते. आम्ही वन हक्क कायद्याअंतर्गत हरकती मागवल्या आहेत. हा रस्ता कोस्टल रोड प्रकल्पाचा भाग आहे आणि त्याला सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. परंतु रस्ते बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या एका मोठ्या हिरव्यागार जमिनीबद्दल संताप व्यक्त करत पर्यावरण कार्यकर्ते झोरू भठेना म्हणाले, मुंबईच्या पर्यावरणावर होणारा हल्ला अखंड सुरू आहे आणि त्याचे परिणाम सर्वांनाच दिसत आहेत. (हेही वाचा: Thane's Majiwada Flyover to Remain Closed: ठाणे येथील माजीवाडा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद; 15 रात्रींसाठी वाहतूक मार्गात बदल)

साधारण 20,648 कोटी रुपये खर्चाच्या या कोस्टल रोड प्रकल्पाचा दुसरा टप्पा 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे मुंबई शहर, त्याची उपनगरे आणि मुंबई महानगर प्रदेश यांच्यातील रस्ते संपर्क वाढेल. मुंबई कोस्टल रोडचा दुसरा टप्पा हा हाय-स्पीड कॉरिडॉर असेल, ज्यामध्ये भूमिगत बोगदे, केबल-स्टेड पूल आणि वाहनांसाठी इंटरचेंज असतील. रस्त्याचे संरेखन अशा प्रकारे नियोजित केले गेले आहे की, ते खारफुटीच्या पट्ट्या, खाड्या आणि वनक्षेत्रांमधून जात आहे. परिणामी, हिरव्यागार आच्छादनाचा मोठा भाग प्रभावित होण्याची शक्यता आहे.