एकीकडे देश कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढत आहे, तर दुसरीकडे म्युकरमायकॉसिस (Mucormycosis) म्हणजेच काळ्या बुरशीच्या रुग्णांची स्थिती व संख्या गंभीर होत चालली आहे. आता मुंबईत (Mumbai) काळ्या बुरशीचा संसर्ग झालेल्या तीन मुलांवर शस्त्रक्रिया करून त्यांचा डोळा काढण्यात आला आहे. या प्रकरणामुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे. डॉक्टरांनी सांगितले की, लहान मुलांमधील म्युकरमायकॉसिस किंवा ब्लॅक फंगसची प्रकरणे चिंताजनक आहेत. म्युकरमायकॉसिस हा संसर्ग मुख्यत्वे मधुमेह किंवा इतर आजार असणाऱ्या कोविड-19 रुग्णांमध्ये दिसून येत आहे. तसेच कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्येही मोठ्या प्रमाणात हा संसर्ग आढळून आला आहे.
एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे. त्यानुसार, शस्त्रक्रिया झालेल्या या मुलांची वये अनुक्रमे 4, 6 आणि 14 वर्षे आहे. या मुलांवर मुंबईतील दोन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील पहिल्या दोन मुलांना मधुमेह नाही, परंतु 14 वर्षांच्या मुलाला मधुमेह आहे. डॉक्टरांनी सांगितले की, यामध्ये एक चौथा मुलगा आहे जो 16 वर्षांचा आहे. कोविडमधून बरे झाल्यानंतर त्याला मधुमेह झाला. या मुलाच्या पोटाचा काही भाग काळा बुरशीने संसर्गित झाला आहे.
फोर्टिस हॉस्पिटलचे ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. जेसल शेठ म्हणाले, 'कोविडच्या दुसर्या लाटेत मधुमेह असलेल्या दोन मुलींना काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याचे आम्ही पाहिले. यातील 14 वर्षांची मुलगी आमच्याकडे आल्यानंतर 48 तासांमध्ये तिचा एक डोळा काळा पडला. हा संसर्ग नाकामध्येही पसरत होता मात्र सुदैवाने तो मेंदूपर्यंत पोहोचला नाही. या मुलीवर सहा आठवड्यांपर्यंत उपचार सुरु होते, दुर्दैवाने तिला डोळा गमवावा लागला. (हेही वाचा: Pune: बिनविषारी, दीर्घकाळ टिकणारा हँड सॅनिटायझर लवकरच बाजारात, पुणे-स्थित स्टार्ट-अपची घोषणा)
शेठ यांनी पुढे सांगितले की, कोविडमधून बरी झालेली एक 16 वर्षांची मुलगी होती. तिला आधी मधुमेह नव्हता मात्र जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा तिला मधुमेह होता. तिच्या आतड्यांमधून रक्तस्त्राव होत होता. आम्ही एंजियोग्राफी केली आणि असे आढळले की ब्लॅक फंगसने तिच्या पोटाजवळ रक्तवाहिन्या संक्रमित केल्या आहेत. दरम्यान, ब्लॅक फंगसच्या संसर्गाचे लवकरात लवकर निदान होणे आवश्यक आहे. हा संसर्ग खूप वेगाने शरीरात पसरत जातो. हा संसर्ग मेंदूकडे जाण्यापासून रोखण्यासाठी शल्यचिकित्सकांना रूग्णाचे नाक, डोळे किंवा त्याचा जबडाही काढून टाकावा लागतो.