Deepak Kesarkar | (Photo Credit - Twitter)

दक्षिण मुंबई मधील मुंबादेवी (Mumba Devi), झवेरी बाजार (Zaveri Bazar), काळबादेवी (Kalbadevi) या भागात प्रचंड वाहनकोंडी होत असल्याने रस्त्याने चालणार्‍यांनाही या ठिकाणी वाट काढणं कठीण होत असतं. हातगाडी चालकही या भागात काम करत असतात. ही सारी परिस्थिती पाहता आता दक्षिण मुंबई मधील चिंचोळ्या रस्त्यांचा हा भाग कोंडीमुक्त करण्यासाठी तसेच हातगाडी चालकांचे श्रम कमी करण्यासाठी आता त्यांना बॅटरीवर चालणार्‍या हातगाड्या दिल्या जाणार आहेत. याबाबतची घोषणा नुकतीच मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

झवेरी बाजारात सोने-चांदीची उलाढाल होते. लहान मोठे व्यवसाय आहेत. तसेच याच भागामध्ये मुंबादेवी मंदिर देखील आहे. मुंबादेवीच्या दर्शनाला भाविक मोठ्या संख्येत येत असतात. अशावेळी पार्किंग, वाहनांची ये जा आणि त्यामध्ये हातगाड्या नेणार्‍यांना रस्ता काढावा लागतो यामुळे त्यांचीही दमछाक होते. ‘हातगाडी चालकांना बॅटरीवर चालणारी हातगाडी द्यावी का याबद्दल विचार सुरू आहे. कामगारांकडून मालाची त्याद्वारा झटपट वाहतूक होईल. त्या गाड्या ठेवण्यासाठी जागाही उपलब्ध केली जाईल. तसेच वाहतूक कोंडीही होणार नाही. येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणखी कोणते उपाय करता येऊ शकतात, यासाठी आयआयटीसह अन्य काही संस्थांकडून सर्वेक्षण केले जाणार आहे. ही कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाही करण्यात आली आहे’, अशी माहिती केसरकर यांनी दिली.

मुंबादेवी च्या गल्लीमध्ये पार्किंगची देखील मोठी समस्या आहे. त्यासाठी बीएमसी बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळ उभारत आहे. पाच ठिकाणी वाहनतळे उभारण्यात येतील.मुंबादेवीमध्ये 546 मोटारींसाठी पार्किंगच्या जागा उपलब्ध होणार आहेत.