aditi tatkare

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अर्जांची पडताळणी सुरु आहे. राज्यात, मुख्यमंत्री माझी लाडली बहिण योजनेच्या महिला लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष घरोघरी जाऊन तपासले जात आहेत. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, लाभार्थी महिलांच्या घरात चारचाकी वाहन आहे की नाही आणि त्या योजनेचे निकष पूर्ण करतात की नाही याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आता माहिती मिळत आहे की, या पडताळणी प्रक्रियेनंतर महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजनेमधून विक्रमी पाच लाख महिला लाभार्थ्यांना वगळले आहे. मात्र सरकारने स्पष्ट केले आहे की, अपात्र लाभार्थ्यांवर कोणतीही वसूलीची कारवाई केली जाणार नाही, म्हणजेच त्यांचे लाभ परत घेतले जाणर नाहीत.

परंतु आता अपात्र घोषित केलेल्या महिलांना यापुढे निधी मिळणार नाही. जुलै ते डिसेंबर 2024 पर्यंत, राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेसाठी अंदाजे 21,000  कोटी रुपये वाटप केले, ज्यामुळे 2.46 कोटींहून अधिक महिलांना फायदा झाला. मंत्री अदिती तटकरे यांनी अपात्र घोषित केलेल्या पाच लाख महिलांची माहिती दिली. त्यापैकी 2.3 लाख महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत, तर 1.1 लाख महिला 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहेत. याव्यतिरिक्त, कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत चारचाकी वाहन असलेल्या, नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी आणि स्वेच्छेने योजनेतून माघार घेतलेल्या अशा श्रेणींमध्ये 1.6 लाख महिला मोडतात.

विधानसभा निवडणुकीपूर्वी, निकषांची काटेकोरपणे तपासणी न करता महिलांना घाईघाईने या योजनेसाठी पात्र घोषित करण्यात आले. त्यावेळी सरकारने पात्रता अटी पडताळल्या नाहीत आणि सर्व अर्जदारांच्या खात्यात थेट पैसे जमा केले. तथापि, निवडणुकीनंतर, आता नियम आणि पात्रता निकषांचा आढावा घेतला जात आहे. हिंगोलीमध्ये काही पुरुषांनी महिला असल्याचे भासवून या योजनेचा फायदा घेतल्याचे उघड झाले आहे. कायदेशीर कारवाईच्या भीतीने चार पुरुषांनी स्वेच्छेने योजनेतून माघार घेतली आहे. योजनेतून बाहेर पडणाऱ्या आठ लाभार्थ्यांपैकी चार पुरुष असे होते, ज्यांनी लाभ घेण्यासाठी त्यांच्या आधार कार्डवर महिलांचे फोटो वापरले होते. आतापर्यंत या चारही व्यक्तींना सहा हप्ते मिळाले आहेत, ज्यांची प्रत्येकी 9,000 रुपये इतकी रक्कम आहे. (हेही वाचा: Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांवर कारवाई, मुंबईत नेमके काय घडले नेमके? घ्या जाणून)

दरम्यान, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आला. आता राज्याचा अर्थसंकल्प मार्चच्या पहिल्या आठवड्यात सादर होणार आहे आणि सरकारने लाडकी बहिन योजनेअंतर्गत दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, छाननी प्रक्रिया आणखी काही महिने सुरू राहील, म्हणजेच सध्या पाच लाख अपात्र लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढू शकते.