औरंगाबाद (Aurangabad) येथे MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी अर्धनग्न मोर्चा काढला. राज्य सरकारचे महापोर्टल बंद करावे यासह इतर मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला होता. यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाले होते. औरंगाबाद येथील पैठणगेट येथून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे विद्यार्थ्यांनी निवदेन दिले आमि मोर्चाचा समारोप करण्यात आला.
ऑनलाईन पद्धतीने होत असलेल्या स्पर्धा परीक्षा रद्द करुन ऑफलाईन घेण्यात याव्या. तसंच पीएसआय पूर्व परीक्षा संयुक्त परीक्षेमधून वगळून स्वतंत्र घेण्यात यावी, एसपीएससीच्या वेळापत्रकासोबत जागांची आकडेवारी देखील जाहीर करावी, उत्पादन शुल्क एमपीएससीच्या जागा वाढवाव्यात, पोलिस भरतीचे वेळापत्रक जाहीर करावे या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या संकेतस्थळावरुन माहिती घ्यावी लागत होती. म्हणूनच विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य शासनाने विविध परीक्षांसाठी एकच ई महा परीक्षा पोर्टल सुरु केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून निकालापर्यंत सर्व गोष्टी एकाच पोर्टलवर पाहता येणार आहेत. मात्र हे महापोर्टल बंद करावे, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.