Mumbai | Relationships Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

टॅक्सी एग्रीगेटर उबरने (Uber) त्यांच्या ‘लॉस्ट अँड फाउंड इंडेक्स’ची 2022 मधील एडीशन (Uber Lost and Found Index 2022) प्रसिद्ध केली आहे. यानुसार, उबरमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मुंबई (Mumbai) हे देशातील सर्वात विसराळू शहर (Most Forgetful City) ठरले आहे. दिल्ली-एनसीआर दुसऱ्या तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता सर्वाधिक विसराळू शहरांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या निर्देशांकानुसार, लोक अनेकदा वाहनात मिठाई, आधार कार्ड, क्रिकेट बॅट्स, स्पाइक गार्ड्स आणि कॉलेजचे प्रमाणपत्र यासारख्या अनोख्या वस्तू विसरले आहेत.

गेल्या एक वर्षात लोक उबर गाडीत सर्वात जास्त प्रमाणात, फोन, स्पीकर, हेडफोन, पाकीट आणि पिशव्या अशा गोष्टी विसरले आहेत. त्यापाठोपाठ किराणा सामान, थर्मॉस, पाण्याच्या बाटल्या आणि फोन चार्जर येतात. कारमध्ये सामान्यपणे विसरलेल्या टॉप टेन वस्तूंबद्दल बोलायचे तर, यामध्ये फोन, कॅमेरा, लॅपटॉप, बॅग, वॉलेट, स्पीकर, किराणा सामान, रोख रक्कम, पाण्याच्या बाटल्या आणि हेडफोन यांचा समावेश आहे.

या निर्देशांकात त्या दिवसांचा देखील उल्लेख आहे ज्या दिवशी बहुतेक लोकत्यांचे सामान कारमध्ये विसरले आहेत. हे दिवस आहेत- 25 मार्च, 24 मार्च, 30 मार्च, 31 मार्च आणि 17 मार्च. रविवारी लोक त्यांचे कपडे गाडीत विसरले आहेत. बुधवारी सर्वात जास्त लॅपटॉप आणि सोमवार व शुक्रवारी हेडफोन आणि स्पीकर विसरले आहेत. दुपारी एक ते तीन या वेळेत सर्वाधिक सामान कारमध्ये विसरले आहेत.

उबर इंडियाचे सेंट्रल ऑपरेशन्सचे संचालक नितीश भूषण म्हणाले, ‘आम्ही जाणतो की एखादी वस्तू हरवणे हे तणावपूर्ण असू शकते परंतु जर तुम्ही उबरमध्ये प्रवास करताना एखादी वस्तू हरवली तर, तुमच्याकडे ती शोधण्याचा पर्याय असतो. मात्र, ट्रिप संपल्यानंतर मागे राहिलेल्या कोणत्याही वस्तूसाठी उबर किंवा चालक जबाबदार नाहीत. तुमचे सामान हरवल्यास उबर मदत करू शकते, परंतु ड्रायव्हरकडे तुमचे सामान आहे किंवा ते तुम्हाला परत करतीलच याची हमी देऊ शकत नाही, कारण स्वतंत्र कंत्राटदार आहेत. (हेही वाचा: BMC On Flood: यंदा मुंबई तुंबणार नाही! बीएमसी म्हणते 'शहरात 60-70मिमी पाऊस पडला तरी साचणार नाही पाणी')

हरवलेल्या वस्तूबद्दल ड्रायव्हरशी संपर्क करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना उबर अॅपद्वारे कॉल करणे. जर ड्रायव्हरने उत्तर दिले आणि त्याच्याकडे तुमचे सामान असल्याची पुष्टी केली, तर ते परत घेण्यासाठी तुम्हा दोघांनाही सोयीचे असेल अशी वेळ आणि ठिकाण निवडा.