Representational Image (Photo Credit- Flickr)

Monsoon 2020 Updates: महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनने (Monsoon) लँडफॉल (Landfall) केला आहे. परिस्थिती अनुकूल असल्याने मान्सून पुढील 48 तासांत संपूर्ण राज्य व्यापणार आहे. यासंदर्भात कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते (IMD Scientist Shubhangi Bhute) यांनी माहिती दिली आहे. राज्यात गुरुवारी मान्सून दाखल झाला असून तो आणखी थोडा पुढे सरकला आहे. रत्नागिरीच्या हर्णे पर्यंत मान्सून पोहोचला आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली. त्यामुळे पुढच्या 48 तासांत उर्वरित महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे.

दरम्यान, मान्सूनने गुरुवारी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यात हजेरी लावली. गेल्या 24 तासांत कोकणसह मराठवाड्यातदेखील चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. मान्सूनने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्याला सुरूवात केली आहे. (हेही वाचा - Monsoon 2020 Updates: महाराष्ट्र, गोव्यासह 'या' राज्यात पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा-IMD)

कोकणात मान्सूनने दमदार हजेरी लावली असून सिंधुदुर्गच्या काही भागात 140 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच मालवणमध्ये 158 मिमी पाऊस झाला आहे. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये 115 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर बीड जिल्ह्यात 62 मिमी पावसाची नोंद झाली.

मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला असून शेतीतील खरीप हंगामांच्या कामांना वेग आला आहे. अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडीभरून वाहत आहेत. येत्या 48 तासांत महाराष्ट्राशिवाय ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, दक्षिण गुजरात, दक्षिण मध्य प्रदेश, झारखंड आणि बिहार मधील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.