Maharashtra Weather Updates: 'निसर्ग' चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून थोड्या वाढलेल्या उकाड्यानंतर आता हवामान खात्याने महाराष्ट्रात मुंबई (Mumabi), ठाणे (Thane) आणि कोकणपट्ट्यासह उर्वरित राज्यातील नागरिकांना मोठी दिलासादायक बातमी दिली आहे. आज (11 जून) दिवशी महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे यंदाच्या मान्सूनचं आगमन झाले आहे. सकाळपासूनच मुंबई शहरामध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. पहाटे काही दमदार सरी बसरल्यानंतर काही काळ ऊन पडलं होतं मात्र आता पुन्हा शहरात काही ठिकाणी ढगाळ वातावरण झालं आहे. पण भिंवडी ग्रामीण भागात पाऊस बरसला आहे. तर काल रात्रीपासून परभणीमध्येही पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहराच्या अनेक भागात पाणी तुंबल्याचं चित्र पहायला मिळायलं आहे.
मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्वीटरच्या माध्यामातून महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच पुढील 48 तासामध्ये महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये शिरकाव करण्यास पोषक वातावरण असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात आज वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर मुंबई, ठाणे, पालघर परिसरामध्ये 13,14 जून हे दिवस मुसळधार पावसाचे ठरू शकतात. असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. Monsoon 2020 in Konkan Updates: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या 24 तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता; जाणून घ्या 10-15 जून दरम्यानचा हवामान अंदाज.
के.एस.होसाळीकर यांचे ट्वीट
महाराष्ट्र मध्ये मान्सुन दाखल pic.twitter.com/04R9qhAFO0
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 11, 2020
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून सक्रिय होण्यास पोषक वातावरण होते असे मागील काही दिवसांपासून सांगण्यात आले होते. दरम्यान 1 जूनला केरळमध्ये मान्सून आल्यानंतर 3 जूनला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाने झोडपलं. त्यानंतर महाराष्ट्रात मान्सून लांबतो की काय? अशी शंका आली होती मात्र अपेक्षेप्रमाणे आज महाराष्ट्रात मान्सुनचं आगमन झालं आहे.