Shiv Sena MLA Rajan Salvi On Nanar Refinery Project | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नाणार रिफायनरी प्रकल्प (Nanar Refinery Project) रद्द करण्यात आला आणि तो विषय संपला. परंतू, शिवसेना (Shiv Sena) आमदार राजन साळवी (Shiv Sena MLA Rajan Salvi) यांच्या वक्तव्यामुळे हा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला. इतकेच नव्हे तर या वक्तव्यावरुन शिवसेना पक्षातही खळबळ उडाली. या प्रकारानंतर शिवसेनेचे पॉवर हाऊस 'मातोश्री' येथून या वक्तव्याची दखल घेतली गेली आणि लागलीच खुलासाही करण्यात आला. शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर (Milind Narvekar) आणि शिवसेना खासदार विनायक राऊत (Shivsena MP Vinayak Raut) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

थेट 'मातोश्री'वरुन खुलासा

शिवसेना सचीव आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलींद नार्वेकर यांनी ट्विट करुन स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, 'जैतापूर प्रकल्प आणि नाणार प्रकल्पाबाबत आमदार राजन साळवी जी यांनी केलेले वक्तव्य ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही.'

काय म्हणाले   राजन साळवी?

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना राजन साळवी यांनी म्हटले होते की, कोकणमध्ये नोकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे नाणारसारखा प्रकल्प व्हावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. भविष्यात असा प्रकल्प झाला तर मुख्यमंत्री त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देतील, असे आमदार राजन साळवी यांनी म्हटले होते.

नाणार विषय संपला- खासदार विनायक राऊत

आमदार राजन साळवी यांनी नाणारबाबत व्यक्त केलेले हे त्यांचे व्यक्तीगत मत आहे. ते शिवसेना पक्षाचे मत नाही. नाणार हा विषय केव्हाच संपला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

काय आहे नाणार प्रकल्प?

नाणार हा एक रिफायनरी प्रकल्प आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात अससेल्या माडबन आणि नाणार परिसरात हा प्रकल्प प्रस्तावित आहे. परंतू, या प्रकल्पसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन अधिग्रहन करावी लागणार आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे. स्थानिकांनाही स्थलांतरीत व्हावे लागणार आहे. याशिवाय प्रदुषणही मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता व्यक्त करत स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. स्थानिकांचा आवाज लक्षात घेत शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला होता.