CM Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लोकानुनय करणाऱ्या योजनांचा धडाका लावला आहे. ज्यामध्ये लाडका भाऊ, लाडकी बहिण (Ladki Bahin Yojana) यांसारख्या योजनांचा समावेश आहे. या योजना फसव्या असल्याची आगोदरच टीका होत असताना, आता एका योजनेची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 'मुख्यमंत्री तर्थयात्रा योजना' (Tirth Yatra Scheme) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेच्या जाहिरातीमध्ये चक्क तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचे छायाचित्र छापले आहे. छायाचित्र पाहून या व्यक्तिचा मुलगा आणि कुटुंबीयांना धक्का बसला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आमच्या वडिलांचा ठावठिकाणा सांगा, असे अवाहन केले आहे. दमरम्यान, हा फोटो नेमका कोठून आला याबाबत मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणतेही स्पष्टीकरण आले नसल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

नेमके प्रकरण काय?

राज्यातील जेष्ठ नागरिक आणि वृद्धांना धार्मिक स्थळांचे दर्शन घडविण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक योजना आणली आहे. ज्याला मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असे नाव दिले आहे. या योजनेच्या जाहिरातींचा धडाका राज्य सरकारने लावला आहे. दरम्यान, या जाहिरातीमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचे छायाचित्र (फोटो) चर्चेत आहे. धक्कादायक असे की, ज्या ज्येष्ठ नागरिकाचा फोटो सरकारने जाहिरातीसाठी वापरला आहे. तो व्यक्ती पाठिमागील तीन वर्षांपासून बेपत्ता आहे. त्याचे कुटुंबीयसुद्धा त्याचा शोध घेऊन थकले आहेत. दरम्यान, सरकारच्या जाहिरातीवर फोटो पाहून हे कुटुंबीय हबकून गेले आहे. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला असून, आमच्या वडिलांचा ठावठिकाणा सांगा, असे अवाहन बेपत्ता व्यक्तीचा मुलगा आणि कुटुंबीयांनी केले आहे. (हेही वाचा, Ladka Bhau Yojana 2024: 'लाडका भाऊ योजना' साठी नेमकं पात्र कोण? कसा करायचा अर्ज? जाणून घ्या योजनेचे तपशील)

जाहिरातीत दिसणारे छायाचित्र कोणाचे?

सरकारच्या जाहिरातमीध्ये दिसणारे छायाचित्र हे ज्ञानेश्वर विष्णू तांबे यांचा असून ते पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील वरुडे गावचे रहिवासी आहेत. ज्ञानेश्वर तांबे हे गृहस्थ पाठिमागील तीन वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, अचानक त्यांचा फोटो सरकारच्या जाहिरातीवर दिसला आणि ते हबकुनच गेले. त्यांना आश्चर्याचा धक्काही बसला. हे कुटुंबीय आता सावरले असून तांबे यांच्या मुलाने आपल्या वडिलांचा ठावठिकाणा सांगावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनीच आता आमच्या वडिलांची भेट घडवून द्यावी अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. (हेही वाचा,  Majhi Ladki Bahin Yojana Online Registration Process: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे, नोंदणी, निकष आणि अर्ज कसा करावा? घ्या जाणून.)

काय आहे योजना?

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणजेच 60 वर्षांवरील लोकांसाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देशभरातील 66 तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी फायदा घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या मंडळींना राज्य सरकार सुमारे 30 हजार रुपयांचा लाभ देणार आहे. हा लाभ अनुदान स्वरुपात असेल.

दरम्यान, राज्य सरकारच्या योजना आणि जाहिरातीवरुन आता राजकारण सुरु झाले आहे. जाहिरातीवर “आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन” असा मजकूर आहे. या मजकूरासोबत छापलेल्या फोटोवरुन शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे. अनेका तोंडावर पडुन देखील राज्य सरकार योजनांच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करण्याचे सोडत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.