महाराष्ट्रामध्ये आज 8,369 कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे, यासह एकूण संक्रमितांची संख्या 3,27,031 वर पोहोचली आहे. राज्यात फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या अनेक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यासह सार्वजनिक क्षेत्रात जनतेशी संपर्कात असणारे अनेक नेते मंडळीही कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परभणी येथील खासदार फौजिया खान व शिवसेना आमदार वैभव नाईक यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याची बातमी आली होती. आता शिवसेनेचे आमदार व राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनादेखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
स्वतः अब्दुल सत्तार यांनी ट्वीट करत ही बातमी दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘थोडी शंका आली होती म्हणून आज कोरोना तपासणी केली, दुर्दैवाने रिपोर्ट पॉजीटीव्ह आली आहे परंतु घाबरण्याची आवश्यक्ता नाही, कोरोना प्रादूर्भावाच्या काळात अनेक ठिकाणी मदतकार्य करताना चुकून प्रादुर्भाव झाला असेल, परंतु आपल्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन परत आपल्या सेवेत तत्पर होईल.’ अब्दुल सत्तार हे औरंगाबादच्या सिल्लोडचे (Sillod) शिवसेनेचे आमदार व सध्याच्या मंत्रिमंडळात राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत.
अब्दुल सत्तार ट्वीट -
थोडी शंका आली होती म्हणून आज कोरोना तपासणी केली,दुर्दैवाने रिपोर्ट पॉजीटीव्ह आली आहे परंतु घाबरण्याची आवश्यक्ता नाही,कोरोना प्रादूर्भावाच्या काळात अनेक ठिकाणी मदतकार्य करतांना चुकून प्रादुर्भाव झाला असेल परंतु आपल्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन परत आपल्या सेवेत तत्पर होईल.
— Abdul Sattar (@AbdulSattar_99) July 21, 2020
लीलावती रुग्णालयात प्राथमिक उपचारनंतर सत्तार हे सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. तसेच प्रकृती उत्तम असल्याची माहिती मुलगा समीर यांनी दिली आहे. दरम्यान, शिवसेनाचे आमदार वैभव नाईक यांनाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली आहे. नाईक हे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करतात. वैभन नाईक यांनी नुकताच सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याचा दौरा केला होता. (हेही वाचा: शिवसेना आमदार वैभव नाईक यांना कोरोना व्हायरस संसर्ग, संपर्कात आलेल्यांचीही चाचणी होणार)
तसेच, खा. फौजिया खान यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाजवळचा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचीही तपासणी केली जाईल, असे परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर (Collector Deepak Mugalikar) यांनी म्हटले आहे.