शिवसेना (Shiv Sena) आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनाही कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला आहे. वैभन नाईक यांनी नुकताच सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यामुळे आता आमदार नाईक यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंचीही कोरोना व्हायरस चाचणी केली जाणार आहे. वैभव नाईक हे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करतात. नाईक यांनी दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी भेटी दिल्या होत्या. तसेच अनेक लोकही त्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे आमदार नाईक यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून काढण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
प्राप्त माहिती अशी की, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता. या वेळी अनेक लोक या दौऱ्यात सहभागी झाले होते. यात पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश होता. त्यामुळे या दरम्यानच नाईक यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला असा कयास आहे. (हेही वाचा, Coronavirus: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परभणी येथील खासदार फौजिया खान यांना कोरोना व्हायरस संसर्ग)
दरम्यान, गेल्या काही काळात राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी यांना कोरोना व्हायरस संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक नगरसेवक, आमदार, खासदार आणि पक्षाचे पदाधिकारी यांनाही कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. यात काहीचे निधनही झाले आहे. त्यामळे येणाऱ्या काळात सर्वच क्षेत्रातील व्यक्ती आणि नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.