Coronavirus: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परभणी येथील खासदार फौजिया खान यांना कोरोना व्हायरस संसर्ग
Fauzia Khan | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या परभणी (Parbhani ) येथील राज्यसभा खासदार फौजिया खान (Fauzia Khan) यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. फौजिया खान यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाजवळचा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचीही तपासणी केली जाईल, असे परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर (Collector Deepak Mugalikar) यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी येथील नांदखेडा रोड येथे फौजिया खान यांचे निवासस्थान आहे. निवासस्थानी असतानाच त्यांना कोरोना व्हायरस लागण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे खान यांना कोरोना व्हायरस संसर्ग कोणत्या माध्यमातून झाला हे जाणून घेतले जाईल. तसेच, त्यांच्या संपर्का आलेल्या सर्व व्यक्तिंची कोरोना व्हायरस चाचणी केली जाईल असेही जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे. दरम्यान, खान यांच्या घरासह नजिकचा परिसरही सील करण्यात आला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, प्रकृती अस्वस्थतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर रुग्णालयात दाखल)

दरम्यान, परभणी जिल्ह्यातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. सरकारच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. गर्दी टाळावी, कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडल्यास तोंडाला रुमाल लावणे आवश्यक आहे, असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.