वाढते वायू प्रदूषण (Air Pollution), सातत्याने ढासळणारा हवा गुणवत्ता निर्देशांक (Mumbai AQI) आणि शहराचा कोंडणारा श्वास यांमुळे मुंबईकर आगोदर हैराण आहे. त्यातच शहरामध्ये विविध ठिकाणी सुरु असलेले खासगी आणि शासकीय गृहनिर्माण प्रकल्प शहरातील वाढत्या धुळीत भर घालतात. अशाच एका प्रकल्पाद्वारे धूळ उडवत वायू प्रदूषण वाढविणाऱ्या एका बांधकाम विकासकास महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (Maharashtra Housing and Area Development Authority) अर्थातच म्हाडाने (MHADA) जोरदार दणका दिला आहे. आपण आपल्या प्रकल्पावर धूळ कमी करणाऱ्या मार्गदर्शक तत्वांचे जोवर वापर करत नाही, तोवर आपणास प्रकल्प सुरु करण्यास परवानगीच दिली जाणार नाही. आपणावर लादलेले निर्बंध हटविणार नाही, असा सज्जड कायदेशीर दमच म्हाडाने सदर धुरळाबहाद्दर बिल्डरला दिला आहे.
काम बंद आदेश
मुंबई शहरातील अंधेरी परिसरात सुरु असलेला एक बांधकाम प्रकल्प थांबविण्याचे आदेश म्हाडा अधिकाऱ्यांनी कायम ठेवले. प्राप्त माहितीनुसार, संगम सोसायटी पुनर्विकास प्रकल्पाला धूळ नियंत्रण मार्गदर्शक तत्वांचे पालन न केलेबद्दल म्हाडा द्वारे काम बंद आदेश जारी करण्यात आला. तसेच, आगोदर धुळ उडविणे थांबवा मगच काम सुरु करण्याबाबत परवागी मागा, असेही म्हाडाने सुनावल्याचे समजते. (हेही वाचा, Mumbai: गोरेगाव परिसरातील तीन हजार घरांसाठी म्हाडा लॉटरी)
निर्बंधांच पालन करेपर्यंत नोटीस कायम
म्हाडा अधिकाऱ्याच्या हवाल्याने मीड डेने दिलेल्या वृत्तानुसार, आम्ही सदर बांधकाम व्यवसायिकास काम बंद नोटीस सोमावारी बजावली आहे. या नोटीसनुसार बिल्डरला धूळ नियंत्रण करण्यासाठी लागू करण्यातआलेल्या निर्बंधांचे प्रत्यक्ष पालन करत असल्याचे दाखवावे लागेल. जोपर्यंत निर्बंधांचे पालन होत नाही तोवर काम बंद नोटीस कायम असेल, असे म्हाडाने म्हटले आहे. याच अधिकाऱ्याने पुढे म्हटले आहे की, आता या बिर्डरला (बांधकाम व्यवसायिक) आपण धूळ नियंत्रण करत असल्याचे म्हाडाला लेखी स्वरुपात द्यावे लागेल. त्यानंतर आमचे एक पथक प्रत्यक्ष प्रकल्पावर जाऊन धूळ नियंत्रण होते आहे किंवा नाही याची पाहणी करेल आणि खात्री पटल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.
म्हाडाच्या कारवाईचे बीएमसीकडून स्वागत
व्यवसायिकाने खरोखरच धूळ नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्याची म्हाडा अधिकाऱ्यांच्या पथकास खात्री पटली तरच काम बंध आदेश मागे घेण्यात येईल. दरम्यान, बीएमसीने म्हाडाच्या कारवाईचे स्वागत केले आहे. महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, म्हाडाने अशा प्रकारचा आदेश जारी करणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण म्हाडा ही एक नियोजन प्राधिकरण आहे. ते शहातील विविध ठिकाणच्या गृहनिर्माण प्रकल्पांना मान्यता देतात.
आठ मजले असलेली संगम सोसायटीची जुनी इमारत पुनर्विकास करण्यासाठी सोमवारी पाडण्यात आली. या वेळी ही इमारत जमीनदोस्त करण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाने धूळ नियंत्रण करण्यासाठी असलेल्या कोणत्याही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, असा ठपका म्हाडाने या बिल्डरवर ठेवला आहे. म्हाडाने म्हटले आहे की, इमारत पाडताना भोवताली ताडपत्री/हिरव्या कापडाचा/जूट शीटचा वापर न करणे, जागेवर पाणी शिंपडण्याचा अभाव आणि बांधकाम साहित्य आणि कचरा उघडा न ठेवणे अशा अनेक तत्वांच्या उल्लंघनाचा बिर्डरवर आरोप आहे.