प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: Flickr)

इंडिअन मेडिकल असोसिएशन (IMA)तर्फे 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबवली जात आहे. 27 नोव्हेंबरपासून या मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेंतर्गत 1300 शाळा, 933 अंगणवाड्या मिळून तब्बल 10 लाख मुलांना ही लस देणे हे ध्येय ठेवण्यात आले आहे. मात्र ही मोहिम सुरू झाल्यानंतर, काही मुलांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पालकांकडून येऊ लागल्या. ही लस शरीरासाठी हानिकारक आहे, या लसीचा शरीरावर विपरीत परिणाम होत आहे अशा अफवा पसरायला सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्यातील एका शाळेतल्या मुलांनी तर नपुंसकता येईल म्हणून ही लस घेण्यास नकार दिला. याबाबत गोवर, रुबेलामुळे आरोग्यावर होणारा परिणाम अत्यंत घातक आहे. या लसीमुळे हे धोके टाळता येतील. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनने केले आहे.

राज्यात सर्वत्र गोवर-रुबेला लसीकरण मोहिम सुरू आहे. या लसीमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत होता, त्यामुळे पालकांनी खाजगी डॉक्टरांच्या सल्ल्याने ही लस घेतली जावी अशीही मागणी केली होती. याबाबत आयएमएने ही लस पूर्णतः सुरक्षित असून त्याचा मुलांच्या शरीरावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशीच मोहिम इतर राज्यांमध्येही यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. आता ही मोहिम महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी या मोहिमेला विरोध न करता सहकार्य करण्याची गरज आहे.

व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर्स आणि नर्सेस या मोहिमेमध्ये सामील आहेत. या लसीबद्दलही त्यांना व्यवस्थित माहिती आहे. प्रामुख्याने इंजेक्शनच्या भीतीमुळे थकवा, अशक्तपणा किंवा चक्कर आल्यासारखे वाटते. मात्र ही लक्षणे क्षणिक आहेत. पुढे त्यांचा शरीरावर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच या मोहिमेचा कोणताही राजकीस संबंध नसून आरोग्य संघटनांकडून ही मोहीम राबली जात असल्याचे आयएमएने स्पष्ट केले आहे.