कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या संक्रमणामुळे दहावी बोर्डाची परीक्षा (SSC Exam) रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकार यावर्षी अंतर्गत मूल्यमापनावरून दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण देणार आहे. अकरावी प्रवेशासाठी परीक्षा घेता येत असतील मग, दहावीच्या परीक्षा का घेता येत नाहीत? अशी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल करण्यात आली होती. यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्टीकरण दिले आहे. कोरोना महामारीमुळे रद्द झालेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुणांचे मूल्यांकन कसे करावे? आणि त्याचे वाटप कसे करावे? याबाबत अद्याप कोणताही फॉर्म्यूला तयार केला नसल्याचे महाराष्ट्र बोर्डाने सांगितले आहे.
इयत्ता दहावीची यंदाची परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला पुण्यातील धनंजय कुलकर्णी यांनी जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. "एसएससी, आयसीएसई, सीबीएसई अशा वेगवेगळ्या बोर्डांनी विद्यार्थ्यांचे दहावीचे निकाल वेगवेगळ्या सूत्रांनी लावले तर, आणखी गोंधळ वाढेल. पदविकांच्या विविध कोर्सच्या प्रवेशातही गोंधळ होईल. एसएससी बोर्डाने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटीची घोषणा केली आहे. मग इयत्ता दहावीची परीक्षा घेणेही शक्य आहे. याप्रश्नी न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशा विनंती याचिकेत करण्यात आल्याचे अॅड. उदय वारुंजीकर यांनी सांगितले होते. हे देखील वाचा- Cyclone Tauktae: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा घेतला आढावा
एसएससी बोर्डाचे वकील किरण गांधी यांनी कोर्टाला सांगितले की, ही याचिका खूप लवकर दाखल करण्यात आली आहे. ते म्हणाले की, दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण कसे वाटप करायचे? याचा फॉर्म्युला अद्याप मंडळाने तयार केलेला नाही. त्यामुळे आता मंडळाची परीक्षा समिती त्यावर एक फॉर्म्युला तयार करुन अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवणार आहे.
कोर्टाने एसएससी आणि अन्य प्रतिवादी (केंद्र, सीबीएसई बोर्ड आणि आयसीएसई बोर्ड) यांना या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 मे रोजी होणार आहे.